Rapido Rider’s Struggle to Support Family : अनेकदा एखाद्या ठिकाणी पोहचायला उशीर झाला की, आपण कोणताही विचार न करता रॅपिडो, ओला, उबेर बुक करतो. पण, इथे काम करणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मागे न दडलेली एक गोष्ट लपलेली असते. तर दिल्ली-एनसीआरमधील एका व्यक्तीला घाईगडबडीचा एक प्रवास हीच हृदयस्पर्शी गोष्ट सांगून गेला. दिवसा ऑफिसची नोकरी करणारा आणि कामाच्या आधी व नंतर ‘रॅपिडो’साठी दुचाकी चालवणारा हा चालक, आपल्या कुटुंबासाठी कशाप्रकारे उदरनिर्वाह करतो आहे हे वाचून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
एक्स (ट्विटर) युजरला कामावर जायला उशीर होत होता म्हणून त्याने मेट्रोने जाण्याऐवजी ‘रॅपिडो’ बाईक बुक केली. चालक अवघ्या दोन मिनिटांत तिथे पोहोचला. पण, शिखरला त्याच्या खोलीच्या चाव्या शोधण्यात वेळ गेला. मग रॅपीडो चालकाने त्याला खाली येण्याचा आग्रह करत तीन वेळा हाक मारली.
मग प्रवाशी शेखरने “दादा, इतकी घाई का करतो आहेस” असे उत्सुकतेने विचारले. त्यावर रॅपिडो “मला ऑफिसला जायला उशीर होईल” असं अगदी हसत म्हणतो.
मग आश्चर्यचकित होऊन शिखरने विचारले की, नोकरी असूनही तो रॅपिडोसाठी गाडी का चालवत आहे. त्यावर चालकाने सांगितले की, त्याच्या ऑफिसच्या नोकरीतून त्याला महिन्याला २०,००० रुपये मिळतात. पण, ते त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्याला बायको आणि तीन मुले आहेत, त्यापैकी एक जन्मापासूनच दिव्यांग आहे. त्या मुलाच्या औषधांवर आणि उपचारांवरच दरमहा सुमारे १०,००० रुपये खर्च येतो. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी, तो सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत रॅपिडो मग १० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ऑफिसचे काम आणि त्यानंतर रात्री १० किंवा ११ वाजेपर्यंत पुन्हा रॅपीडो चालवतो.
पोस्ट नक्की बघा…
जेव्हा प्रवाशाने ‘मग तू किती तास झोपतोस असे कुतूहलाने विचारले. तेव्हा चालक ‘गेल्या ८ महिन्यांपासून मी रात्री ५ तासांपेक्षा जास्त झोपलोच नाही’ असे सांगतो आणि ‘आता देवाची हीच इच्छा असेल तर तेच योग्य आहे’ असे म्हणून त्यांच्यातील संवाद संपवतो. या भेटीबद्दल विचार करताना प्रवासी शिखरने लिहिले की, या संवादामुळे त्याला जाणवलं की तो किती भाग्यवान आहे. कारण अनेक लोक अतिशय कठीण जबाबदाऱ्या असूनही शांतपणे, नम्रतेने आणि संयमाने त्या पार पाडत असतात.
नेटकरी देखील ही पोस्ट पाहून, त्या चालकाच्या जिद्दीचं आणि निःस्वार्थ वृत्तीचं कौतुक करू लागले. तर काहींनी म्हटलं की, प्रत्येक डिलिव्हरी करणाऱ्या बाइक टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तीमागे एक असं आयुष्य असतं, जे दिसत नाही. पण त्यात खूप संघर्ष, जबाबदाऱ्या आणि अद्भुत सहनशीलता दडलेली असते ; आदी अनेकविध कमेंट्स करताना दिसून आले.
