konkan shimga utsav viral video : कोकणातील शिमगा उत्सव हा परंपरा, श्रद्धा व सांस्कृतिक वारसा जपणारा सण म्हणून ओळखला जातो. शिमगोत्सवाला कोकणात गणेशोत्सवाइतकेच महत्त्व असते. यंदाही कोकणात परंपरेनुसार होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतो आहे. गावोगावी दररोज रात्री होळी लावण्याबरोबरच वेगवेगळ्या लोककला, पारंपरिक नृत्य, पालखी सोहळे सुरू आहेत. मुंबईकडून चाकरमानी गावाकडे आल्यामुळे गावात उत्साहाच्या वातावरणात आणखीनच भर पडली आहे. हा उत्सव रंगपंचमीपर्यंत असाच सुरू असतो.
दरम्यान, एका एसटी चालकाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पालखी सोहळा सुरू असतो. तितक्यात गावकरी रस्त्यावरून पालखी घेऊन जात असतात आणि समोरून लाल परी (एसटी) येते. गावकऱ्यांची गर्दी, उत्साह पाहून चालक रस्त्यात एसटी थांबवतो. तो फक्त एसटी बस थांबवतच नाही, तर उतरून देवाच्या पाया पाडण्यासाठी आणि पालखी नाचवण्यासाठी अगदी आनंदाने पुढे जातो. गावकरीसुद्धा त्याला पालखी उचलण्याचा मान देतात. पालखी खांद्यावर घेऊन तो बसचालक अगदी उत्साहाने, आनंदात पालखी सोहळ्याचा आनंद घेतो.
“आपला कोकणी माणूस” (Viral Video)
सणा-वाराला कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सुट्टी असते. पण, काही दुकानमालक, व्यापारी, पोलीस अधिकारी किंवा अगदी ट्रेन, बस, मेट्रोचे चालक दिवस-रात्र किंवा कधी एक्स्ट्रा ड्युटीवर असतात. त्यादरम्यान त्यांना सण साजरा करण्याची इच्छा असते. पण, कामाच्या जबाबदारीनं त्यांना बांधून ठेवलेलं असतं. तर आज व्हायरल व्हिडीओत, रस्त्यावर एसटी बस नेण्यासाठी पुढे जागा नाही हे पाहून एसटी बसच्या त्या चालकानं बहमधून उतरून पालखी सोहळण्याचा आनंद लुटला आणि मग पुन्हा बस चालवण्यासाठी सज्ज झाला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kokani_mharakya आणि @kokani_mhorakya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि ‘एसटी ड्रायव्हरला सलाम! ही असते आवड’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “नाद पाहिजे हो भक्तीचा”, “आपला कोकणी माणूस”, “हे फक्त कोकणातच अनुभवता येणार”, “त्यांचंसुद्धा मन आहे. कारण- त्यांचासुद्धा सण आहे”, “खूपच छान काका अंगावर काटा आलाच; पण डोळेपण पाण्यानं भरले”, “यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो… संस्कृती रक्तातच असते”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
