Student Desi Jugaad Viral Video : जिथे हुशारी असते तिथे कशाचीच कमी नसते असं म्हणतात. म्हणजे अगदी मोजक्या साधनांमध्ये काही तरी करून दाखवण्यासाठी भारतीय नेहमीच पुढे असतात. अगदी आपल्याच भाषेत सांगायचं तर जुगाडूपणा भारतीयांना उत्तम जमतो आणि वेळ, खर्च व कष्ट वाचवणारा जुगाड कोणाला आवडत नाही. त्यामुळे अशा मंडळींचे कौतुक सुद्धा सोशल मीडियावर होताना दिसते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये विद्यार्थ्याने केलेला जुगाड चर्चेचा विषय ठरतो आहे.

केरळमधील लेविन पॉलोस या विद्यार्थ्याने ‘ऑटोमॅटिक कर्टन सिस्टम’ (स्वयंचलित पडद्यांची यंत्रणा) स्वतः तयार केली आहे. त्याने सुरुवातीला या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले विविध वस्तू – जसे की वायर्स, बॅटरी, मोटर, इतर इलेक्ट्रॉनिक भाग गोळा केले. त्यानंतर, त्याने प्रत्येक वायर काळजीपूर्वक जोडली, इलेक्ट्रिकल सेटअपची चाचणी केली आणि प्रत्यक्ष बसवण्यापूर्वी (इन्स्टॉलेशन) सर्व घटक व्यवस्थित जोडले. अत्यंत पद्धतशीरपणे काम करत त्याने पडद्यांच्या वरच्या बाजूला ही यंत्रणा बसवली, भिंतीवर वायर्स नीटनेटकेपणाने लावले आणि सर्व काही योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी काही अंतिम बदल केले.

सेटअप पूर्ण झाल्यावर पॉलोसने आपल्या या यंत्रणेची चाचणी घेतली. हातात एक छोटा रिमोट घेऊन त्याने बटण दाबले, ज्यामुळे मोटर सक्रिय झाली आणि पडदे आपोआप उघडले गेले. ही यंत्रणा सुरळीतपणे काम करत असल्याचे दाखवण्यासाठी त्याने ही कृती पुन्हा करून पाहिली; एका बटणाच्या क्लिकवर कोणत्याही शारीरिक कष्टाशिवाय पडदे सहजपणे उघडले जात होते. घरी तयार केलेल्या या प्रकल्पामुळे साध्या पडद्यांचे रूपांतर एका सोप्या स्वयंचलित यंत्रणेत झाले.

व्हिडीओ नक्की बघा….

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ @ppv931680 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘केवळ ऑनलाइन कंटेंट पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी या विद्यार्थ्याने उपयुक्त शोध लावण्यात आपला वेळ खर्ची घालवला. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे’, ‘अनेकांनी त्याच्या संयमाचे व अचूकतेचे कौतुक केले’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत. तुम्ही त्यांचे इन्स्टाग्रामवरील इतर रिल्स पहिले तर तरुणाचे घर अनेक ‘डीआयवाय’ (DIY) प्रयोगांनी भरलेले दिसते आहे.