student breaking dustbin at school Viral Video : आई- बाबा आपल्या मुलांना कसे चांगले नागरिक बनावे याचे प्रत्यक्ष कृतीतून धडे देत असतात. त्यामुळे बालपणात लहान मुलांवर झालेले चांगले संस्कार त्यांचं आयुष्य घडवतात, असं म्हणतात. त्यासाठी घर, परिवार, समाज आणि सभोवतालचं वातावरण नेहमी चांगलं असलं पाहिजे. कारण- या सगळ्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांना वाईट गोष्टी न शिकवता, चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, असं आपल्याला मोठी माणसं नेहमी सांगतात. तर आज त्याच प्रात्यक्षिक व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.
‘अलिबो झिमो’ (Alibo Zhimo) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत एका चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातून हातून चुकून शाळेतील कचराकुंडी फुटली किंवा तुटली. याबद्दल त्याने कोणालाही काहीही सांगितले सुद्धा नाही. पण त्याने शांतपणे कचरापेटी उचलली आणि दुसऱ्या दिवशी तोच मुलगा मोठी गडद हिरव्या रंगाची कचरापेटी घेऊन एका कॉरिडॉरमधून चालताना दिसला. त्याने ती कचरापेटी दोन्ही हातांनी काळजीपूर्वक पकडली होती, तर त्याच्या बाजूने आणखी एक विद्यार्थीही चालत होता.
चूक सुधारण्याची ही भावना प्रत्येकाकडे असावी (Viral Video)
शाळेचा गणवेश, बो-टाय आणि हातात कचरापेटी घेऊन विद्यार्थी वर्गात येतो आणि तुटलेली कचरापेटी काढून नवीन कचरापेटी बसवतो आणि नंतर आपल्या मित्रांकडे बघून हसतो. त्याच्या चेहऱ्यावर आपल्याकडून चूक सुधारल्याचा अभिमान दिसतो. त्याने चूक ओळखली आणि ती सुधारण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. अशा प्रकारे जबाबदारी स्वीकारणे अनेकदा मोठ्या माणसांनाही जमत नाही. पण, या चिमुकल्याने नकळत चूक झाल्यावर जबाबदारी घेण्याची, चूक मान्य करण्याची आणि ती सुधारण्याची खूप चांगली शिकवण व्हिडीओद्वारे दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आपलं सरकारही त्याच्यासारखं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो”, “अशी चूक मान्य करून ती सुधारण्याची भावना प्रत्येकाकडे असावी”, “अनेक वेळा लोक चुका लपवण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्यावर ढकलतात. पण या मुलाने मात्र आपली चूक मान्य करून ती स्वतः सुधारली, त्यामुळे लोकांना त्याचं वागणं विशेष आणि प्रेरणादायी वाटलं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
