viral video student gift teacher ring : कधी कधी एक मूल संपूर्ण कुटुंबाकडून सांभाळलं जात नाही; पण शिक्षिका एकाच वेळी २५ ते ५० विद्यार्थ्यांना सांभाळते. विद्यार्थ्यांना हाताळणं हे शिक्षकांसाठी किती कठीण असतं याचा आपण शालेय जीवनात अनुभव घेतलाच असेल. मग अशा वेळी त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांची चीड आणि शिक्षकांचा नकळत अभिमान वाटायचा. कारण- त्या कितीही चिडल्या, रागावल्या तरीही दुसऱ्या दिवशी सगळं विसरून आपल्या मुलांप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याला मायेने शिकवायच्या. त्यामुळे शाळेत याच शिक्षिका विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका ठरायच्या. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाडक्या शिक्षिकेला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून जबरदस्त सरप्राईज दिले आहे.
सगळे विद्यार्थी मिळून त्यांच्या सगळ्यात आवडत्या, लाडक्या शिक्षिकेला ‘सरप्राईज’ द्यायचं ठरवतात. विद्यार्थी शिक्षिकेला लक्षात राहतील, अशा भेटवस्तू देतात. सर्वप्रथम विद्यार्थ्यांबरोबरची फोटो फ्रेम, साडी आणि मग छोट्याशा बॉक्समधून चक्क अंगठी भेट म्हणून देतात. प्रत्येक भेटवस्तू दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मोठे स्मित दिसून येते. पण, अंगठी पाहून आधी धक्का, मग आश्चर्य आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसतात आणि एवढी महाग वस्तू का आणली, अशी प्रतिक्रिया त्या हावभावाद्वारे व्यक्त करतात, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.
मुलांच्या प्रेमाने शिक्षिका भावूक (Viral Video)
भेटवस्तू देण्याआधी ती घेण्यासाठीची मेहनत व्हिडीओच्या अगदी सुरुवातीला दाखवण्यात आली आहे. सगळे विद्यार्थी मिळून सगळ्यात आधी अंगठी घ्यायला जातात, मग साडीच्या दुकानात जाऊन साडी विकत घेतात. त्यानंतर मग फोटो फ्रेम दुकानातून बनवून घेतात आणि मग शिक्षिकेला भेटून, त्यांच्या हाती सोपवतात. तसेच शिक्षिकेच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून विद्यार्थीही भारावून जातात आणि जोरजोरात आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rinshad_yt_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “तिने किती चांगुलपणा दाखवला असेल आणि किती प्रेम दिलं असेल, याची कल्पना करा. म्हणूनच तिला इतकं प्रेम आणि आदर मिळतो आहे”, “आजकालची Gen Z मुलं शिक्षकांचा तितकासा आदर करत नाहीत; पण हे पाहून खूप आनंद झाला”, “ती सोने, साडी किंवा फोटो फ्रेममुळे नाही, तर मुलांनी मनापासून दिलेल्या प्रेमामुळेच भावूक झाली”, “तुम्ही आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण शिक्षिकेला भेट दिलात” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून आले आहे.
