Student Surprise Tution Teacher Viral Video: गुरू–शिष्याचं नातं हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नसतं; तर ते प्रेम, विश्वास आणि आपुलकीनं भरलेलं असतं. या नात्यात शिस्त असते, आदर असतो आणि मनापासून केलेलं प्रेमही असतं. कधी शिक्षक थोडे कडक वाटतात; पण त्याच शिक्षकांचा आधार विद्यार्थ्यांना आयुष्यभर मिळतो. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात, कधी प्रेमानं समजावतात, तर कधी थोडी शिस्तही लावण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच हे नातं अनेकदा आयुष्यभर लक्षात राहणारं असतं. अशाच एका सुंदर आणि भावनिक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो आणि मनाला स्पर्श करतो.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लहान मुलं त्यांच्या ट्यूशन टीचरला एक गोड सरप्राईज देताना दिसतात. व्हिडीओत एक मुलगा मॅडमला आधी डोळे बंद करायला सांगतो. मॅडमनी डोळे बंद करताच मुलं त्यांच्या हातात एक गिफ्ट ठेवतात. काही खोडकर मुलं गमतीनं पाल आहे, असं सांगून मॅडमना थोडंसं घाबरवतात आणि त्यामुळे सगळे हसतात.
नंतर मॅडम गिफ्ट उघडतात आणि त्यात एक सुंदर पर्स असते, ते पाहून त्या खूप खूश होतात. त्या मुलांना पैसे खर्च करू नका, असं सांगत असतात; पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना लपवता येत नाही. मुलंही मॅडमचं कौतुक करीत, “वाह! मॅम, किती छान आहे” असं म्हणतात. हे साधं, पण मनापासून दिलेलं सरप्राईज सगळ्यांच्या आठवणींत स्थान मिळवतं.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला असून, हजारो लाइक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. प्रतिक्रियांमध्ये अनेक युजर्सनी शिक्षक–विद्यार्थी नात्याच्या या सुंदर क्षणाचं भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलं, “विद्यार्थी खूप उत्साही आणि आनंदी दिसत आहेत, हे खरंच मनाला भावणारं आहे.” दुसऱ्या युजरनं प्रतिक्रिया देताना म्हटलं, “जो शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमानं आणि आनंदाने वागतो, त्याला विद्यार्थीही मनापासून मान देतात.”
काहींनी तर आपल्या शालेय आणि ट्यूशनमधील आठवणीही शेअर केल्या आहेत. एका मजेशीर प्रतिक्रियांमध्ये एक युजर म्हणतो, “आपण सगळेच या टप्प्यातून गेलो आहोत.” तर आणखी एका युजरनं लिहिलं, “या व्हिडीओत कुठलाही दिखावा नाही. फक्त प्रामाणिक आदर आणि प्रेम आहे, जे या सरप्राईजला अजून खास बनवतं.” हा व्हिडीओ गुरू–शिष्य नात्याची खरीखुरी, हळवी बाजू दाखवतो आणि म्हणूनच तो सोशल मीडियावर इतका व्हायरल होत आहे.

