आज मोबाईल अॅप्समुळे आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. घरबसल्या जेवण, औषधं, किराणा अशा गोष्टी आपण सहज मागवतो; पण आपल्याला ही सोय मिळावी म्हणून डिलिव्हरी बॉय आणि वर्कर्स खूप मेहनत करतात. ते दिवस-रात्र काम करतात. तरीही त्यांना मिळणारा पगार खूप कमी असतो. पेट्रोलचा खर्च, लांब अंतर आणि कामाची ठरावीक वेळ नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी आणि अनुभवांचे व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो, जे लगेच व्हायरल होतात. म्हणजेच आपल्यासाठी सोपं झालेलं आयुष्य त्यांच्या दृष्टीनं मात्र अजूनही संघर्षाचं आहे.
स्विगीमध्ये काम करणाऱ्या कपिल पटेल या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ अलीकडे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. मध्य प्रदेशातील सागर येथील कपिलनं ६.५ किलोमीटरची डिलिव्हरी केली; पण त्यासाठी त्याला फक्त ३४ रुपये मिळाले, असं त्यानं व्हिडीओमध्ये सांगितलं.पेट्रोलचे दर जवळपास ९४ रुपये प्रतिलिटर असताना इतक्या लांब डिलिव्हरीसाठी एवढे कमी पैसे मिळणं योग्य नाही, असं त्यानं म्हटलं. राग आणि निराशेतून त्यानं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि “६.५ किलोमीटरची डिलिव्हरी आणि फक्त ३४ रुपये,” असा प्रश्न कंपनीला विचारला.
फक्त २० तासांत हा व्हिडीओ १० लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आणि अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा डिलिव्हरी वर्कर्सना मिळणाऱ्या कमी मोबदल्याचा प्रश्न चर्चेत आला. या प्रकरणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युजर्सनी कपिलच्या बाजूनं उभे राहत स्विगी आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांनी डिलिव्हरी पार्टनर्सच्या पेमेंटकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली.
पाहा व्हिडीओ
“इतक्या कमी पैशात इतकी मेहनत म्हणजे शोषण आहे,” असे मत काहींनी व्यक्त केले. काहींनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर डिलिव्हरी बॉयला योग्य मोबदला देणे ही कंपन्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. काहींनी याबाबत, “अशा कंपन्यांना धडा शिकवायला हवा,” असे म्हटले. काही युजर्सनी याकडे वेगळ्या नजरेने पाहत, “काम स्वीकारण्यापूर्वी अटी माहीत असतात,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
एकानं तर “यांना संधी मिळाली, तर परदेशातही डिलिव्हरी करून घेतील,” असं म्हटलंय. या घटनेमुळे गिग इकॉनॉमीतील कामगारांचं वास्तव, त्यांची संघर्षमय परिस्थिती आणि मोठ्या कंपन्यांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
