Viral Video: शाळा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अभ्यास, मित्रमैत्रिणी, मजा-मस्ती आणि असंख्य आठवणी उभ्या राहतात. शाळेतील दिवस हे आयुष्यातील सर्वात सुंदर आणि निरागस दिवस मानले जातात. रोज सकाळी शाळेची तयारी करताना होणारी लगबग, गणवेश घालून मित्रमैत्रिणींसोबत शाळेत जाणे, प्रार्थनेच्या वेळी एका रांगेत उभे राहणे, वर्गात शिक्षकांचे शिकवणे, मधल्या सुट्टीत डबा शेअर करणे आणि तास संपण्याची आतुरतेने वाट पाहणे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा असते. अभ्यास, गृहपाठ आणि परीक्षेची चिंता असली तरी त्यासोबतच मित्रांसोबत केलेली मस्ती, वर्गातल्या गमती-जमती, शिक्षकांच्या नकला, खोड्या आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मनापासून हसणे, हेही शालेय जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. शाळा आपल्याला केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर मैत्री, शिस्त, सहकार्य, जबाबदारी, आत्मविश्वास आणि आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांना सामोरं जाण्याची शिकवणही देते. शाळेच्या त्या दिवसांची आठवण आली की चेहऱ्यावर नकळत हसू येते. कारण शाळेतील अभ्यास आणि मजा-मस्ती यांचा सुंदर मेळच बालपणाच्या आठवणींना खास बनवतो.
आजच्या शाळा आणि काही दशकांपूर्वीच्या शाळांकडे पाहिलं तर शिक्षणपद्धतीत मोठा बदल झालेला दिसतो. पूर्वीच्या काळात शाळेत अभ्यास आणि शैक्षणिक गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व दिलं जायचं. पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि चांगले गुण मिळवणे यावर अधिक भर असे. विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, भाषा यांसारख्या विषयांमध्ये चांगली कामगिरी करावी, हीच पालक आणि शिक्षकांची प्रमुख अपेक्षा असायची. अभ्यासासोबत खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम असले तरी त्यांना तुलनेने दुय्यम स्थान मिळत असे. पण, आजच्या शिक्षणपद्धतीत मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ अभ्यासातील गुणांपेक्षा त्यांच्यातील विविध कौशल्ये आणि कलागुणांनाही महत्त्व दिलं जात आहे. चित्रकला, नृत्य, गायन, अभिनय, लेखन, वक्तृत्व, हस्तकला, संगीत, विविध खेळ तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्यांना शाळांमध्ये प्रोत्साहन दिलं जातं. एखादा विद्यार्थी अभ्यासात सरासरी असला, तरी तो चित्रकला, संगीत, नृत्य, क्रीडा किंवा इतर एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो, ही जाणीव आजच्या शिक्षणपद्धतीत अधिक ठळकपणे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची आवड आणि क्षमता ओळखण्याची संधी मिळते.
आता सोशल मीडियावर एका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक चक्क विद्यार्थ्यांसोबत ‘उडी उडी जाय’ या गाण्यावर ताल धरताना आणि मनसोक्त नाचताना दिसत आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून केलेली ही धमाल पाहून शाळेतील वातावरण किती आनंदी आणि उत्साही असू शकतं, याची झलक पाहायला मिळते. वर्गात अभ्यास, शिस्त आणि शिकवण देणारे शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांसोबत अशा पद्धतीने मजा-मस्ती करताना दिसतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या आनंदाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शाळेतील आठवणी अधिक खास होतात. या व्हिडीओतील शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांसोबतचा हा मनमोकळा सहभाग सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dance_guru_krishna या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर, असावे तर असे” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स सर” आणखी एका युजरने लिहिलेय, “सर काय सुंदर नाचलात तुम्ही…”
