passengers offer water to thirsty monkeys viral video : उन्हाळ्याच्या झळा आपल्याला सगळ्यांनाच सोसाव्या लागत आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी कितीही स्किन केअर केलं, स्वतःला स्कार्फने झाकून घेतले तरीही दोन मिनिटे बाहेर पडताच त्या सगळ्या मेहनतीचे पाणी होऊन जाते. या उन्हाळ्याच्या दिवसांत बॅगेत कितीही ओझं वाटलं तरीही आपण पाण्याची बाटली बरोबर ठेवतो किंवा अगदी दुकानातून विकत घेतो. पण, जंगलातून अन्न-पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांचं काय? सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये तहानलेल्या माकडांना प्रवाशांनी माणुसकी दाखवली आहे.

ही घटना २१ मे रोजी दुपारी खंडाळा घाटात घडली. यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद मार्गावरून प्रवास करणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) एक बस घाटाच्या टप्प्यात पोहोचली होती. तेव्हा अचानक एक माकड रस्त्यावर आले आणि बससमोर उभे राहिले, ज्यामुळे बसची वाटचाल क्षणभर थांबली. प्रवासी आणि चालकाने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असताही त्या माकडाने त्याची जागा सोडली नाही. प्रचंड उकाड्यामुळे तो निर्जल झाल्यासारखा दिसत होता. प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी बाटलीतून माकडाला पाणी दिले.

त्याने पाणी पिण्यास सुरुवात करताच, जवळच्याच जंगलातून इतर अनेक माकडं बाहेर आली व बसभोवती उभी राहू लागली. ती माकडंसुद्धा तहानलेली दिसत होती. मग प्रवाशांनी त्या सगळ्या माकडांना स्वतःच्या पाण्याच्या बाटल्यांमधून पाणी दिले. ही संपूर्ण घटना प्रवासी लता श्रीवास यांनी आपल्या मोबाईल फोनवर चित्रित केली आणि त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे. या घटनेमुळे उन्हाळ्यात वनक्षेत्रे आणि घाटमाथ्यांवरील वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कितपत आहे, याविषयीही चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

वन विभागाने वन्यजीवांसाठी अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था केल्याचे स्पष्ट केले असले, तरी या व्हिडीओमुळे प्रत्यक्ष जमिनीवर या उपाययोजना किती प्रभावी ठरत आहेत, याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि व्हिडीओ पाहणाऱ्यांनी प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की, वन्यजीव मार्गिकांमधील (wildlife corridors) पाण्याच्या स्रोतांवर, विशेषतः तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान, अधिक कडक देखरेख ठेवली जावी. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @loksattalive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.