Animal Fight Video: जंगलात कधी काय पाहायला मिळेल, याचा अंदाज लावणं कठीण असतं. उत्तराखंडमधील कॉर्बेट टायगर रिझर्व्हमधून असाच एक दुर्मिळ व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ अजगराला (पायथन) आपल्या जबड्यात पकडून शांतपणे जंगलाच्या दिशेने जाताना दिसत आहे. हा थरारक क्षण तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
कॉर्बेट टायगर रिझर्व्हचे फील्ड डायरेक्टर साकेत बडोला यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “कॉर्बेटमध्ये आलात तर कोणत्याही क्षणी काहीही पाहायला मिळू शकतं.” हा व्हिडीओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी भानुदास पिंगळे यांनी शूट केल्याचं सांगण्यात आलं आहे.
काही सेकंद शिकार पाहिली, मग तोंडात पकडून निघून गेला
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला वाघ काही वेळ अजगराभोवती फिरताना दिसतो. त्यानंतर तो खाली वाकून अजगराला तोंडात पकडतो आणि पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्याला थोडं इकडे-तिकडे हलवतो. मग आजूबाजूला नजर टाकून तो अजगराला तोंडात धरून झुडपांच्या दिशेने निघून जातो. हा संपूर्ण प्रकार इतका दुर्मिळ होता की, तिथे उपस्थित असलेले पर्यटकही हे दृश्य पाहून थक्क झाले.
सोशल मीडियावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. एका युजरने लिहिलं की, “आयुष्यात कदाचित एकदाच असं दृश्य पाहायला मिळतं.” दुसऱ्या युजरने म्हटलं, “निसर्गात काहीही घडू शकतं.” तर आणखी एका युजरने गंमतीत लिहिलं की, “वाघावर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.”
वाघ सापांची शिकार करतात का?
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघाचं मुख्य अन्न म्हणजे हरीण, रानडुक्कर, गौर आणि इतर मोठे सस्तन प्राणी. मात्र, संधी मिळाल्यास ते लहान प्राणी किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांवरही हल्ला करू शकतात. असे प्रकार फार क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे कॉर्बेटमधील हा व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या व्हिडीओवरून वाघ नियमितपणे अजगर किंवा इतर सापांची शिकार करतात, असा निष्कर्ष काढता येत नाही. हा एक दुर्मिळ वन्यजीव प्रकार म्हणून पाहिला जात आहे.
