Father Saves Toddler Viral Video : स्वतः पावसात भिजेल पण लेकाच्या डोक्यावर छत्री पकडेल, स्वतः गर्दीतून जाईल पण लेकीला एसीची तिकीट काढून देईल, दोन घास जास्त खाण्यासाठी ऑफिसमध्ये चार तास जास्त काम करेल असा कष्ट, त्याग करणारा बाप प्रत्येकाच्याच आयुष्यात असेल. आई म्हणजे घराच्या चार भिंती, पण वडील म्हणजे घराचे छत असते. म्हणूनच प्रत्येक मुलाच्या नजरेत वडील हा त्यांचा पहिला ‘सुपर हिरो’ असतो. तर आज सोशल मीडियावर अशाच एका सुपर हिरोचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

बांगलादेशातील किशोरगंज येथे एक आधी धक्कादायक वाटणाऱ्या घटनेने शेवटी अगदी दिलासा दिला आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजून ३० मिनिटांनी भैरब रेल्वे स्टेशनवर वडील आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत पडला. माहितीनुसार, ट्रेन जवळपास दीड तास उशिरा पोहोचली होती. त्यामुळे गोंधळात त्या कुटुंबाला वेळेवर उतरता आलं नाही. ट्रेन पुन्हा सुरू होताच, घाईगडबडीत वडिलांनी आपल्या लहान मुलाला हातात घेत उतरायचा प्रयत्न केला.

गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान मूल त्या व्यक्तीच्या हातांतून निसटून गाडी व फलाट यांच्यामधील अरुंद पोकळीत पडले. कोणताही संकोच न करता, त्या वडिलांनी आपल्या एका वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी खाली उडी घेतली. त्यांनी त्या मुलाला मिठीत घेतले आणि फलाटाच्या कडेखालील भिंतीला लागून ते जमिनीवर सपाट झोपले. अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे धावत्या गाडीचे डबे त्यांच्यावरून पुढे निघून गेले असतानाही, वडील आणि मूल दोघेही कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले.

व्हिडीओ नक्की बघा…

आईने सोडला सुटकेचा निश्वास (Viral Video )

रेल्वे निघून गेल्यावर स्टेशनवर उपस्थित सगळेच बाबा आणि मुलं सुखरूप आहे ना हे पाहण्यासाठी गेले आणि त्यांनी विचारपूस केली. त्या मुलाची आईसुद्धा रुळांवर उतरली, आपल्या मुलाला मिठीत घेऊन अक्षरशः रडू लागली; जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ThePremium24X या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घडलेली घटना सविस्तर लिहिली आहे. ज्यामुळे बाबा आणि मुलांच नातं का खास असते हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे.