Rhinos Fight Viral Video : माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भांडणं होतात. कधी अन्नासाठी, कधी शिकारीवरून, कधी एकमेकांना चिडवल्यामुळे तर कधी दुसऱ्या हद्दीत प्रवेश केल्यामुळे. तुम्ही अनेकदा प्राण्यांच्या गोंडस वागण्याचे किंवा श्वान -मांजरांच्या भांडणांचे व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सोशल मीडियावर सध्या एक असा व्हायरल व्हिडीओ चर्चेत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. नेपाळमधील चितवन नॅशनल पार्कजवळ दोन गेंड्यांची भर रस्त्यात जोरदार हाणामारी झाली आणि हा थरार पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले.

कृष्ण दास यांनी सांगितल्यानुसार राष्ट्रीय उद्यान चितवन नॅशनल पार्क, नेपाळमधून एक मोठा (वयस्कर) गेंडा सौराहा शहरात चुकून आला. मग स्पर्धा करण्यासाठी एक तरुण गेंडा त्याच्या मागे आला. नंतर या दोघांमध्ये रस्त्यावरच आपापल्या क्षेत्रासाठी जोरदार भांडण सुरु झाले. दोन्ही गेंडे सतत एकमेकांवर धावून जात होते आणि आपापलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्यक्षदर्शी सुद्धा इतके घाबरले की, दुकान बंद करू लागले. तर काही उत्साहाने पाहत होते आणि काही जण मोबाईलमध्ये शूट सुद्धा करून घेत होते.

आणि जिंकणाऱ्याला फुलं मिळालं… (Viral Video)

कृष्ण दास नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यानाला वन्यजीव दर्शनासाठी भेट द्यायला गेले होते. तेव्हा त्यांना अपेक्षेपेक्षाही काहीतरी वेगळंच पाहायला मिळाले आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ‘सौराहा’ या पर्यटन शहराच्या रस्त्यांवर, दोन गेंड्यांमध्ये भांडण झाले. पण, शेवटी मजेशीर क्षण दिसतो. त्यातल्या एका गेंड्याने भांडण थांबल्यानंतर शांतपणे फुले खायला सुरुवात केली होती. जेव्हा ते भांडत नसतात तेव्हा त्यांना फुले खायला आवडतात; असं दास यांनी सांगितलं आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachintha108 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये म्हटलं की, “मी चितवनला वन्यजीव पाहण्यासाठी आलो होतो, पण वन्यजीवच माझ्याकडे आले तेही भांडण घेऊन. आज दोन मोठे एकशिंगी गेंडे शहरात घुसले आणि थेट रस्त्यावरच एकमेकांशी भिडले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पण सगळे लोक आश्चर्याने स्तब्ध झाले होते”. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा “जिंकणाऱ्याला फुलं मिळालं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…