Seller And Passenger Viral Video : आजच्या जगात अनेकदा माणसाची किंमत त्याच्या स्वभावापेक्षा पैशांनी मोजली जाते. गरीब माणूस सत्य बोलला तरी त्याच्याकडे शंकेने पाहिलं जातं. आणि श्रीमंत माणूस चुकीचा असला तरी त्याचं म्हणणं सहज मान्य केलं जातं. परिस्थिती चांगली असेल तर टाळ्या वाजवल्या जातात आणि तीच परिस्थिती वाईट असताना सगळेच तुमच्यावर बोटं दाखवतात. सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून अक्षरशः तुमच्या डोळ्यांत पाणी येईल.
नागरकोइल एक्सप्रेसमध्ये एक प्रसंग पाहिला. एका वयस्कर काकांनी पाण्याची बाटली घेतली आणि ५०० रुपये दिले. पाणी विकणाऱ्याने रुपये ४८० परत दिले… पण, गोंधळात त्या काकांचे १५०० रुपये हरवले. थोड्याशा पैशांवरून ट्रेनमध्ये मोठा वाद झाला. म्हणून सगळ्यांचा संशय ट्रेनमध्ये पाणी विकणाऱ्या मुलावर गेला. पण, तो स्वतःला सिद्ध करत ‘मी पैसे घेतले नाहीत’ असे सांगत होता. पण, कोण ऐकून घ्यायला तयार नव्हतं. शेवटी पैसे त्या अज्ञात व्यक्तीच्या स्वतःच्या खिशातच सापडले आणि क्षणात सगळे शांत झाले.
चांगल्या माणसांच्या बाबतीत असंच होतं… (Viral Video)
पण, या सगळ्या प्रसंगामुळे दोन गोष्टी घडल्या पाणी विकणाऱ्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याच्या चेहऱ्यावरची वेदना खूप काही सांगून गेल्या आणि दुसरीकडे आपल्याकडून चूक झाली याबद्दलची जाणीव, भीती काकांच्या चेहऱ्यावर जास्त दिसू लागली. कधी कधी सत्य समजून न घेता आपण समोरच्याला दोष देऊन मोकळे होतो. पण, जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा माफीपेक्षाही जास्त लक्षात राहतात त्या व्यक्तीच्या डोळ्यातील वेदना आणि आपल्याकडून झालेली चूक. नंतर काकांना पैसे परत मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण, त्या पाणी विकणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा घाम आणि काही सेकंदांची शांतता नकळत खूप काही सांगून गेली. एकदा बघाच व्हायरल होणारा पाणी विक्रेत्या आणि काकांचा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr.sunnyahire या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.”गरीब असला म्हणून प्रत्येक वेळी चोरच असेल असं नाही. कधी कधी परिस्थितीपेक्षा लोकांचे आरोप जास्त मन दुखावून जातात”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा “चांगल्या माणसांच्या बाबतीत असंच होत दादा”, “असं पण खऱ्याची दुनिया राहिली कुठे”, “तो प्रामाणिक होता म्हणून त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, “स्वतःच्या मूर्खपणामुळे दुसऱ्याला त्रास”, “स्वाभिमानाला लागलेली ठेच हे आयुष्यभर लक्षात राहते” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली कमेंट करताना दिसत आहेत…
