woman seller viral video : ट्रेन, बस किंवा रस्त्यावर किंवा अगदी पर्यटकांची गजबज असणाऱ्या ठिकाणी अनेक व्यापारी छोटे-मोठे व्यवसाय करताना दिसतात. व्यापार करणारे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्यांच्या वस्तू विकताना दिसतात. काही व्यापाऱ्यांचं दुकान आकर्षक असतं; तर काही जण त्यांच्या बोलण्याच्या वा आवाजाच्या शैलीनं अनेक ग्राहकांचं लक्ष वेधून घेतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये एखादी वस्तू विकण्यासाठी आणि ग्राहकानं ती विकत घेण्यासाठी व्यापाऱ्यानं काय केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण दिसून येतं आहे.

अनेकदा हातात घेऊन बघितल्याशिवाय, त्याचा वापर नीट होईल का पाहिल्याशिवाय आपण वस्तू विकत घेत नाही. त्याचबरोबर व्यापारीसुद्धा घ्यायचं असेल, तरच वस्तूला हात लाव, असं अगदी असभ्य पद्धतीनं ग्राहकांशी बोलतात. पण, व्हायरल व्हिडीओत व्यापारी महिला वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाशी फक्त खूप चांगल्या पद्धतीने बोलत नाही तर त्याला वस्तू विकत घेतल्यावर त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण सुद्धा देते.

“बजेगा रे बाबा, तू लेके जा रे!” (Viral Video)

हा पर्यटक तमिळनाडूमधील कन्याकुमारी बीचवर फिरायला गेला होता. यादरम्यान तो व्यापारी महिलेकडे शंख घ्यायला जातो. शंख विकणाऱ्या दुकानदार काकूंनी (व्यापारी महिला) पर्यटक ग्राहकाला खूप प्रेमपूर्वक संयम राखून शंख वाजवायला शिकवलं. त्यामध्ये त्यांनी हातात शंख कसा पकडायचा, शंखावर ओठ कशा प्रकारे ठेवायचे आणि कशा पद्धतीनं शंखध्वनी काढण्याचा आनंद घ्यायचा याबद्दलचा सराव करून घेतला. त्या विक्रेत्या महिलेचे प्रयत्न आणि त्या पर्यटकानं न कंटाळता घेतलेले परिश्रम यांची परिणती म्हणजे शेवटी पर्यटकानं शंख उत्तमरीत्या वाजवूनही दाखवला. अनोळखी लोकांकडून मिळालेली मदत आणि आपुलकी पाहून तो पर्यटक भारावून गेला आणि शंख वाजवायला शिकतानाचा व्हिडीओ त्यानं थोडी सकारात्मकता सर्वदूर पोहोचवण्यासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @w_abonmai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “ताई किती शांतपणे आणि पुन्हा पुन्हा त्याला शिकवते आहे”, “त्या काकूंसाठी व्हिडीओला एक लाईक तर केलंच पाहिजे. त्या ज्या पद्धतीनं प्रत्येक ग्राहकाला समजावतात ना”, “बाजेगा रे बाबा, तू लेके जा रे!”, ” व्वा, किती सुंदर” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.