Youtuber Drugged And Iphone Robbed In AC Coach Viral Video : ट्रेनचा प्रवास सुखकर व्हावा, अशी इच्छा आपल्यातील प्रत्येकाची असते. पण, या प्रवासात चोरी करण्यापासून ते अगदी इतरांना “ही माझीच सीट आहे”, असं सांगून विनाकारण त्रास देण्यापर्यंत अनेक प्रवाशांचाही समावेश असतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल एवढं तर नक्की…
यूट्यूबर कनिका देवराणीने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओत आरोप केला आहे की, ब्रह्मपुत्र मेलवर ट्रेन प्रवासादरम्यान तिला आणि तिच्या सहप्रवाशांना ड्रग्ज देऊन लुटण्यात आले. पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी जंक्शन (एनजेपी) येथे ट्रेन थांबली असताना ही घटना घडली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी जंक्शन येथे तिकीट नसलेला एक अनोळखी प्रवासी ट्रेनच्या २ एसी डब्यात चढला. तिच्या म्हणण्यानुसार, त्या अनोळखी व्यक्तीने प्रवाशांवर काहीतरी स्प्रे (ड्रग्ज) केले; ज्यामुळे कनिका आणि तिच्या सहप्रवाशांना नक्की काय झालं ते कळलं नाही. जेव्हा कनिका शुद्धीवर आली तेव्हा तिच्या उशीखाली ठेवलेला तिचा आयफोन आणि सहप्रवाशाचाही फोन दिसेनासा झाला.
कनिकाच्या आईला आयफोनवरून केला फोन (Viral Video)
एवढेच नाही, तर त्या चोराने आरपीएफ अधिकारी आहे, असे सांगून कनिकाच्या आईला आयफोनवरून फोनदेखील केला, पासवर्ड विचारला. तसेच आयफोनच्या लाइव्ह लोकेशनचे ॲक्सेस असूनही पोलिसांनी तिला मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप यूट्यूबरने केला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिन्जल किशोर शर्मा यांनी सांगितले, “ही महिला सध्या गुवाहाटीमध्ये आहे. रेल्वे सुरक्षा दलाने तिची तक्रार नोंदवली आहे. तिचा हरवलेला फोन शोधण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीईआयआर पोर्टलची मदत घेतली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून, भविष्यात अशा कोणत्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर कारवाई केली जाईल.” यूट्यूबरने तिचा क्लेशकारक अनुभव व्हिडीओद्वारे सांगितला; ज्यामुळे ट्रेन प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ यृूट्यूबर कनिका देवराणीच्या @kanika_devrani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.