Virat Kohli Fitness Routine & Diet Plan: क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांची मालिका रचणारा विराट कोहली केवळ जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक नाही, तर फिटनेसचंही जागतिक प्रतीक बनला आहे. आज लाखो तरुण त्याला त्याच्या खेळासाठी नाही, तर त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेही फॉलो करतात. मात्र, एक काळ असा होता की विराटचं वजन जास्त असल्याने त्याला मित्रमंडळी प्रेमाने ‘चीकू’ म्हणायची. पण २०११ नंतर त्याने केलेल्या जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

विराटने विविध मुलाखतींमध्ये आपल्या आहाराच्या सवयींबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातून फिटनेससाठी आवश्यक असलेली शिस्त, सातत्य आणि आत्मनियंत्रण स्पष्ट दिसून येते.

१. “सहा महिने एकच अन्न खाऊ शकतो”

विराटच्या मते, यशस्वी फिटनेसचा पाया म्हणजे सातत्य. तो म्हणतो, “मी सलग सहा महिने दिवसातून तीन वेळा एकच पदार्थ खाऊ शकतो. त्याचा मला कंटाळा येत नाही.” त्याच्या या वक्तव्यातून फिटनेससाठी चवीपेक्षा ध्येयाला प्राधान्य देण्याची मानसिकता दिसून येते.

२. “चवीपेक्षा शरीराला काय मिळतं, हे महत्त्वाचं”

विराटच्या आहारात सुमारे ९० टक्के अन्न वाफवलेलं किंवा उकडलेलं असतं. त्यात जास्त मसाले नसतात. फक्त मीठ, मिरी आणि लिंबाचा वापर केला जातो. विराटने सांगितले की, त्याला सॅलड, हलक्या ड्रेसिंगसह भाज्या, पॅन-ग्रिल्ड पदार्थ आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेलं अन्न आवडतं. तसेच पंजाबी असल्यामुळे डाळ, राजमा हे पदार्थ तो अजूनही आवडीने खातो.

३. “९५ टक्के वेळा मला माहीत असतं मी काय खातो”

फिटनेस म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर योग्य आहाराचं नियोजनही आहे, असं विराट मानतो. तो म्हणतो, “जर तुम्ही बहुतांश वेळा तुमच्या चवीवर नियंत्रण ठेवलं, तर फिटनेस नक्की मिळू शकतो. ५ टक्के वेळा आवडीचं काहीही खा, पण उर्वरित ९५ टक्के वेळा शरीरात काय जातंय, त्याचा शरीरावर काय परिणाम होणार आहे, याची मला पूर्ण कल्पना असते.” यातून ‘चीट मील’ चालतं, पण ते मर्यादित असावं, हा संदेश मिळतो.

४. कॅलरी मोजण्याची सवय

विराट आपल्या कॅलरी सेवनाबाबत अत्यंत जागरूक असतो. विराटने सांगितले की, किती खायचं, कोणत्या प्रमाणात खायचं आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होईल, याचं त्याला स्पष्ट गणित कळतं. त्यामुळेच त्याची शरीरयष्टी कायम सर्वोत्तम स्थितीत राहते.

५. “माझी बॉडी पीक कंडिशनमध्ये असते”

विराटच्या मते, योग्य प्रमाणात आणि नियोजनबद्ध आहार घेतला तर शरीर कायम सर्वोत्तम अवस्थेत ठेवता येतं. तो म्हणतो, “मला माझ्या कॅलरी काउंटची कल्पना असते. मी योग्य प्रमाणात खात राहिलो तर माझी बॉडी पीक कंडिशनमध्ये राहते.”

फिटनेसचा खरा मंत्र काय?

विराट कोहलीच्या फिटनेसचा गाभा हा कोणत्याही जादुई डाएटमध्ये नसून शिस्त, सातत्य, नियंत्रित आहार आणि नियमित व्यायाम यामध्ये आहे. चव, मोह आणि क्षणिक इच्छा यांवर नियंत्रण ठेवून दीर्घकालीन आरोग्याला प्राधान्य देणं, हाच त्याच्या यशामागचा खरा मंत्र आहे.