Virat Kohli Lookalike Creates Chaos at Lucknow Mall: क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जिथे जातो तिथे चाहत्यांची प्रचंड गर्दी होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, जर तिथे विराट प्रत्यक्षात नसतानाही लोकांनी त्याला पाहिल्याचा समज करून घेतला, तर काय होईल? असाच एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर प्रकार उत्तर प्रदेशातील लखनौ येथे घडला. त्या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना सुरुवातीला खरंच विराट कोहली मॉलमध्ये आला होता, असा विश्वास बसतो. मात्र, काही क्षणांनंतर जे सत्य समोर येते, ते पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात.

हा संपूर्ण प्रकार सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर कार्तिक शर्मा याने रचला होता. कार्तिकचा चेहरा, दाढी, हेअरस्टाईल आणि शरीरयष्टी ही विराट कोहलीसारखी दिसते. त्याने याच साम्याचा फायदा घेत एक भन्नाट प्रँक करण्याचा निर्णय घेतला.

कार्तिकने विराटची ओळख पटावी यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्याने विराटसारखी दाढी ठेवली, केसांची स्टाईलही तशीच केली, हातावरील टॅटूही तशाच पद्धतीने दाखवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जर्सीही परिधान केली. त्यामुळे त्याचा लूक पाहून कोणालाही तो विराटच असल्याचा भास होऊ शकत होता.

त्यावरच तो थांबला नाही. एका आलिशान बीएमडब्ल्यू कारमधून तो मॉलमध्ये दाखल झाला. त्याच्यासोबत चार अंगरक्षकही होते. एवढा तगडा एंट्री सीन पाहताच मॉलमधील लोकांना खात्रीच पटली की, विराट कोहली स्वतः मॉलमध्ये आला आहे.

क्षणातच मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. खरेदी करीत असलेले अनेक लोक आपली कामे सोडून त्याच्या दिशेने धावू लागले. प्रत्येकाला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायची होती. काही जण त्याच्या मागे धावत होते; तर वरच्या मजल्यांवर उभे असलेले लोक रेलिंगजवळ येऊन खाली डोकावत होते. प्रत्येक जण विराटची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक झाला होता.

विशेष म्हणजे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर मॉलमधील सुरक्षा रक्षकदेखील काही काळासाठी फसले. व्हिडीओमध्ये सुरक्षा कर्मचारी कार्तिकला घेरून चालताना दिसतात. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते त्याच्यासोबत फिरत असल्याचेही दिसते.

कार्तिकने व्हिडीओमध्ये सांगितले की, काही सुरक्षा रक्षकांनी तर आपली मूळ जबाबदारी सोडून त्याच्यासोबत चालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा प्रँक आणखी खरा वाटू लागला आणि गर्दी सतत वाढत गेली.

हा व्हिडीओ कार्तिक शर्माने ६ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याने पोस्टला ‘Prank in Largest mall of India’ अशी कॅप्शन दिली. हा व्हिडीओ लखनौमधील लुलू मॉलमध्ये चित्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले. अनेकांनी हा भन्नाट आणि मनोरंजक प्रयोग असल्याचे म्हणत कार्तिकचे कौतुक केले. मात्र, काहींनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “हा केवळ प्रँक नाही. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. सुरक्षा रक्षक जर त्यांच्या मूळ कामापासून दूर गेले आणि त्याच वेळी एखादी खरी आपत्कालीन घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची?”

दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “भाऊ, तू लोकांच्या भावनांशी खेळलास.”

तर आणखी एका नेटकऱ्याने प्रसिद्ध मालिकेचा संदर्भ देत मिश्कील टिप्पणी केली. त्याने लिहिले, “ओळख चोरणे हा विनोद नाही. त्यामुळे लाखो कुटुंबांना त्रास होतो.”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, अनेकांना अजूनही पहिल्या नजरेत हा खरा विराट कोहलीच असल्याचा भास होत आहे. मात्र, काही मिनिटांचा हा प्रँक लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला असला तरी अशा प्रकारांमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात, अशी चर्चाही रंगू लागली आहे.

येथे पाहा व्हिडीओ