Virat Kohli Spotted Travelling by Train in London: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली हा जगभरात सर्वांत प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबाबरोबर लंडन येथे वेळ घालवत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही त्यांची दोन मुलं वामिका आणि अकाय यांच्याबरोबर सध्या लंडनमध्ये राहते. भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या विराट कोहलीची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. विराटचे चाहते भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात आहेत. भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात; पण हाच विराट लंडनच्या रस्त्यांवर अतिशय सामान्य व्यक्तीप्रमाणे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतात जेव्हा कोणी सामान्यांतून खास बनतो, तेव्हा त्याचे आयुष्य पूर्वीसारखे राहत नाही. प्रसिद्ध असण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत. भारतासारख्या देशात जिथे लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तिमत्त्वावर खूप प्रेम करतात, तिथे त्यांना घर सोडणेही कठीण होते. विशेषत: जेव्हा तुम्ही विराट कोहली असता तेव्हा तुम्ही सामान्य माणसांप्रमाणे दिल्ली किंवा मुंबईच्या रस्त्यावर सहजपणे फिरू शकत नाही. विराट कोहलीचा देशात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. विराट कोहलीबरोबर सेल्फी असो की त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी होते. त्यामुळे त्याला देशात मनमोकळेपणानं फिरणंही कठीण होतं.

पण, भारताचे स्टार्स परदेशांत सहजपणे रस्त्यावर फिरू शकतात. कारण- इतर देशांमध्ये आपल्या स्टार्सबद्दल तितकं वेड नाही. विराट कोहलीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कारमधून खाली उतरतो आणि एकटाच रेल्वेस्थानकावर प्रवेश करतो आणि यादरम्यान त्याच्या आजूबाजूला कोणीही नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्समध्ये कोहलीच्या आयुष्याचं शांततापूर्ण आयुष्य, असं वर्णन करीत आहेत.

विराट कोहलीचा लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात विराट कोहली एका आलिशान कारमधून बॅग घेऊन खाली उतरत असताना बाहेर उभी असलेली एक अनोळखी व्यक्ती त्याच्याकडे फोटोची मागणी करते. उत्तरादाखल विराट कोहली त्याला सांगतो की, फक्त एकच फोटो आणि तोही एका ग्रुपमध्ये. त्यानंतर विराट लंडनच्या रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्मवर उभा राहून ट्रेनची वाट पाहत असल्याचंही दिसून येतं. यादरम्यान ती परदेशी व्यक्तीही विराट कोहलीच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांनाही तो लंडनमधील रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना पाहून खूप आनंद झाला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करताना @viratkohli18.in वरून लिहिण्यात आले, विराट कोहली लंडनमध्ये दिसला. आतापर्यंत या रीलला तीन लाखांहून अधिक लाइक्स आणि ७२ लाख व्ह्युज मिळाले आहेत.