सोशल मीडियावर एका मॅचमेकर महिलेने म्हणजेच विवाह जुळवणाऱ्या महिलेने एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये तिने घटस्फोटित आयआयटीयन पुरुषाची अपेक्षा लिहिली. तिच्या या पोस्टवरुन सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या पोस्टचा लोक निषेध करत आहेत. नेमकं हे प्रकरण काय? नेमका वाद का पेटला आहे? जाणून घेऊ.

काय आहे हे प्रकरण?

मॅचमेकर आणि डेटिंग कोच ओएंद्रिला कपूर यांनी त्यांचा एक अनुभव पोस्ट केला आहे. त्या म्हणाल्या की एका घटस्फोटित आयआयटीयनला त्याच्यासाठी वधू हवी आहे. हा पुरुष ३७ वर्षांचा आहे. त्याला जी मुलगी लग्नासाठी हवी आहे ती कुमारिका हवी, ब्राह्मण हवी. तिच्या आयुष्यात तिचा कुठलाही भूतकाळ नसावा. जो ३७ वर्षीय माणूस अशी पत्नी शोधतो आहे तो ब्राह्मण आहे असं त्याने सांगितलं आहे. तसंच तो एका यशस्वी कंपनीत संचालक पदावर आहे. मात्र त्याची मुख्य अपेक्षा हीच आहे की त्याला होणारी पत्नी ३० वर्षांखालील असावी, ब्राह्मण असावी आणि कुमारिका असावी. कुठल्याही मुलाशी, पुरुषाशी तिचे संबंध आलेले नकोत. अशी वधू असेल तर कुठल्याही ब्राह्मण शाखेची मुलगी चालेल असंही या घटस्फोटित आयआयटीयनने म्हटल्याचं कपूर यांनी सांगितलं आहे. लग्न ही अशी गोष्ट आहे जी दोन आयुष्यांना, दोन घरांना कलाटणी देत असते, वेगळं वळण देत असते, नवी सुरुवात असते. तरीही एका घटस्फोटिताने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या ऐकून कुणाचाही संताप होईल. कारण या अपेक्षाच तशा आहेत.

मी त्याला विचारलं की तुला वाटतं का अशी मुलगी तुला स्वीकारेल?

ओएंद्रिला म्हणाल्या, त्याने मला थेट सांगितलं अशी मुलगी लग्नासाठी शोधतोय जिचा कुठला भूतकाळ नकोय. मी त्याला विचारलं भूतकाळ म्हणजे काय? तुला घटस्फोटित मुलगी किंवा महिला वधू म्हणून नको आहे का? त्यावर तो म्हणाला भूतकाळ नको याचा अर्थ मला कुमारिका ब्राह्मण मुलगी हवी आहे. जिचा लग्नाआधी कुणाशीही शरीर संबंध आलेला नाही. मी महिलांच्या विश्वासाबाबत थोडा साशंक आहे. त्यामुळे कुठलाही असा भूतकाळ असलेली मुलगी मला वधू म्हणून नको आहे. ओएंद्रिला यांनी हे ऐकल्यावर त्या या माणसाला म्हणाल्या की तुम्हाला वाटतं का की अशी मुलगी असेल तर ती तुझ्यासारख्या ३७ वर्षीय घटस्फोटित माणसाला नवरा म्हणून स्वीकारेल? या प्रश्नावर त्याच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. ओएंद्रिला यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

Viral News On Social Media
सोशल मीडियावर घटस्फोटित वराची वधूसाठीची अपेक्षा व्हायरल. (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

ओएंद्रिला कपूर कोण आहेत?

ओएंद्रिला कपूर या प्रसिद्ध मॅचमेकर आणि डेटिंग कोच आहेत.

सोशल मीडियावर ओएंद्रिला कपूर यांच्या नावाची चर्चा असते.

सोशल मीडियावर आणि खासकरुन त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्या विविध व्हिडीओ पोस्ट करुन त्यांचे अनुभव सांगत असतात.

इन्स्टाग्रामवर त्यांचे २१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याआधी त्यांनी त्यांना आलेले असे विचित्र अनुभव पोस्ट केले आहेत.

ओएंद्रिला यांनी सांगितल्या प्रमाणे या घटस्फोटित पुरुषाच्या मुलीबाबतच्या अटी काय?

१) ३० वर्षांखालील मुलगी हवी, तिचा विवाह झालेला नको.

२) ३० वर्षे किंवा त्या खालील मुलगी ही ब्राह्मण असावी

३) या मुलीचा कुठलाही भूतकाळ म्हणजेच एखादा बॉयफ्रेंड, जुने काही नातेसंबंध, त्यातून निर्माण झालेले शरीर संबंध असं काहीही नको.

४) तिचा बॉडी काऊंट झीरो असला पाहिजे. तिचा कुठलाही पास्ट नको, तिच्या आयुष्यात कुठलाही पुरुष प्रियकर म्हणून आलेला नको. मी या मागण्या करतोय कारण मी पुरुष आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत?

ओएंद्रिला पुढे म्हणाल्या मी त्याला थेट सांगितलं की तू माझा क्लाएंट होऊ शकत नाहीस. दरम्यान ही पोस्ट ओएंद्रिला यांनी शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स यावर येत आहेत. एका महिलेने म्हटलं आहे हा पुरुष आहे म्हणून त्याचा भूतकाळ महिलांनी माफ करायचा का? मग हा महिलांचा भूतकाळ का विसरु शकत नाही? ही काय मानसिकता आहे? काहींनी या स्थळाची खिल्ली उडवली आहे. कुमारिका ब्राह्मण मुली अशा लोकांपासून चार हात लांब राहतील याची मला खात्री आहे असं या युजर्सनी म्हटलं आहे. आणखी एक युजर म्हणतो या घटस्फोटित पुरुषाने केलेल्या मागण्या समाजातील रुढीवाढी परंपरा अजूनही किती खोलवर रुजलेल्या आहेत हे दाखवून देणाऱ्या ठरल्या आहेत. दुसरा एक युजर म्हणतो आजही अनेक घरांमध्ये लग्नापूर्वीची मुलीची ‘शुद्धता’ आणि तिचा काही ‘भूतकाळ’ नाही ना? हे पाहिलं जातं. त्याबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र दुर्दैवी बाब ही आहे की हे सगळे प्रश्न मुलींना किंवा महिलांना विचारले जातात. पुरुषांना असे प्रश्न विचारायला कुणीही धजावत नाही.

मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं काय?

दरम्यान या प्रकरणाबाबत मानसोपचार तज्ज्ञ असं म्हणतात की कुठल्याही स्त्रीचा विश्वास हा तिच्या भूतकाळावरुन ठरत नाही. ती तुमच्या आयुष्यात येते, त्यानंतर तिच्यावर तुम्ही किती विश्वास दाखवता यावरुन सगळ्या गोष्टी ठरतात. तिचा स्वभाव कसा आहे? ती रोजच्या जगण्यात कसं वागते आहे? या गोष्टीही कळतात. घडून गेलेल्या गोष्टींचा परिणाम भविष्यातल्या गोष्टींवर होईलच असं नाही. पण अशा प्रकारची मागणी असणं हे गैर आहे. जो व्यक्ती स्वतःला आयआयटीयन म्हणतो आहे त्याचे विचार बुरसटलेले आहेत असंच या पोस्टवरुन दिसतं आहे.