Lalit Modi Viral Video: इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी भारतातून फरार झाले. दुसरे फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदी यांनी भव्य अशी पार्टी ठेवली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “आम्ही दोघे भारतातील सर्वात मोठी फरार लोक आहोत”, असे ते दुसऱ्या एका व्यक्तीला सांगताना दिसतात. ललित मोदी यांनी हे गमतीने म्हटले असले तरी त्यांनी व्हिडीओला जे कॅप्शन दिले आहे, त्यावरून ते भारताची टिंगल उडवत आहेत, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.
ललित मोदी यांनी स्वतःची आणि विजय मल्ल्या यांची ओळख उपहासात्मक पद्धतीने एका विदेशी व्यक्तीला करून दिल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. मात्र हे सांगत असतान त्यांचे हावभाव आणि त्यानंतर दोघांचेही कुत्सित हास्य सोशल मीडियावर टीकेच्या केंद्रस्थानी आहे.
‘चला भारतातील इंटरनेट पुन्हा एकदा बंद पाडूया’, असे कॅप्शन ललित मोदी यांन व्हिडीओला दिले आहे. याचा अर्थ या व्हिडीओनंतर भारतात त्याची जोरदार चर्चा होईल, याची त्यांना खात्री आहे. तसेच विजय मल्ल्या याला उद्देशून त्यांनी म्हटले, “माझ्या मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा..”
एक्सवर अनेकजण या पोस्टला निर्लज्ज थट्टा म्हणत आहेत. भारतात घोटाळे करून दोघेही भारताबाहेर पळून गेले आहेत. दोघांच्याही प्रत्यार्पणाची मागणी काही दिवसांपासून होत आहे. ललित मोदी हे २०१० साली भारतातून पळाले, तर विजय मल्ल्या यांनी २०१६ साली भारतातून पळ काढला होता.
एक्सवर एका युजरने म्हटले की, अब्जावधींचा घोटाळा केलेला ललित मोदी भारतातील सर्वात मोठा फरार व्यक्ती असल्याचे निर्लज्जपणे कॅमेऱ्यासमोर म्हणतो. अविश्वसनीय आहे हे.
“ललित मोदी यांनी केलेला विनोद त्या पार्टीत कदाचित सर्वांना हसवणारा ठरला असेल. पण लाखो भारतीयांची ही थट्टा आहे. भारतातील बँका यांनी बुडवलेल्या कर्जांचा अजूनही शोध घेत आहेत. न्यायालयात खटले सुरू आहेत. सामान्य नागरिक कर, महागाईने त्रासला असून यांच्या घोटाळ्याची किंमत मोजत आहे”, अशी टीका बाला नावाच्या एका युजरने एक्सवर केली.

ललित मोदींवर काय आरोप आहेत?
ललित मोदींनी यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांच्यावर मनी लाँडरिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ललित मोदींना बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आलं होतं. आयपीएलच्या २०१० मधील स्पर्धेनंतर त्यांनी देश सोडला होता. तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं जात आहे.
विजय मल्ल्यांवर कोणते आरोप आहेत?
ईडीने आरोप केल्यानुसार, विजय मल्ल्या यांनी बँकांची ६,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर व्याजासह सुमारे १५,००० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांची १४,०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंगच्या तपासासाठी भारतीय तपास यंत्रणांना त्यांचे प्रत्यार्पण हवे आहे. मात्र यूकेमध्ये राहणारे मल्ल्या प्रत्यार्पणाला आव्हान देत आहेत.
