What I Earn In A Month Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका SBI प्रोबेशनरी ऑफिसरचा (PO) पगार मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘What I Earn In A Month’ या शीर्षकाच्या व्हिडीओत एका महिला अधिकाऱ्याने आपला मासिक इनहँड पगार सुमारे ९५ हजार रुपये असल्याचा दावा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींनी कौतुक केले, तर काहींनी शंका उपस्थित केल्या आहेत.
व्हिडीओ कशाबद्दल आहे?
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत संबंधित अधिकारी सांगते की, तिने २०२२ मध्ये IBPS PO परीक्षा उत्तीर्ण करून स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाली. सध्या तिला सेवेत अडीच वर्षे पूर्ण झाली असून, या काळात तिला एकूण पाच वेतनवाढी (इन्क्रिमेंट्स) मिळाल्या आहेत.
९५ हजार हातात येणारा पगार कसा?
तिच्या म्हणण्यानुसार, SBI PO चा सुरुवातीचा मूळ पगार सुमारे ५६ हजार रुपये असतो. मात्र वार्षिक वेतनवाढींसह आणि व्यावसायिक परीक्षांच्या आधारावर मिळणाऱ्या अतिरिक्त वाढींमुळे तिचा सध्याचा इनहँड पगार जवळपास ९५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
याशिवाय, तिला घरभाडे भत्ता किंवा लीज रेंटल स्वरूपात सुमारे १८,५०० रुपये आणि इतर भत्ते मिळून अंदाजे ११ हजार रुपये मिळतात. त्यामुळे तिचे एकूण मासिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या पुढे जाते.
JAIIB आणि CAIIB चे महत्त्व
या व्हिडीओत तिने JAIIB आणि CAIIB या बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिक परीक्षांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कर्मचार्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिली जाते. तिच्या पगारात समाविष्ट असलेल्या तीन वेतनवाढी या याच प्रमाणपत्रांमुळे मिळाल्याचे तिने स्पष्ट केले.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, “असं यश म्हणजे फक्त ‘फ्लेक्स’ नाही, तर अनेक परीक्षा, वर्षानुवर्षांचे शिक्षण आणि मेहनतीचे फळ आहे.”
तर दुसर्या युजरने म्हटले, “हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा अभ्यासाची प्रेरणा मिळाली.”
मात्र काहींनी शंका व्यक्त केल्या. एका युजरने विचारले, “SBI PO ला महिन्याला ९५ हजार हातात येणार पगार कसा माझा मित्र PO आहे आणि तो नेहमी सांगतो की,”एवढा पगार नसतो. वेगवेगळे पे स्केल्स असतात का?”
चर्चेचा मुद्दा काय?
हा व्हिडिओ एकाच वेळी प्रेरणादायी आणि वादग्रस्त ठरतो आहे. एका बाजूला बँकिंग क्षेत्रातील करिअरमध्ये संधी आणि वाढीच्या शक्यता दाखवल्या जात आहेत, तर दुसर्या बाजूला वेतन संरचनेतील वास्तव, भत्ते, पोस्टिंगचे ठिकाण आणि वैयक्तिक परिस्थिती यावरून पगारात किती फरक पडतो, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
एकंदरीत, करिअरमध्ये प्रगती, प्रमाणपत्रे आणि सातत्यपूर्ण मेहनत केल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतही आकर्षक उत्पन्न मिळू शकते, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

