सध्या इंटरनेटवर तसेच अनेक गाण्यांच्या अॅपवरील टॉप प्ले लिस्टवर एक गाणं तुम्हाला सतत दिसतं असेल ते म्हणजे, ‘किकी डू यू लव्ह मी’. मागील अनेक दिवसांपासून हे गाणं इंटरनेटवरील अनेक व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यामागील कारण म्हणजे कीकी चॅलेंज. मात्र आता जगभरातील अनेक शहरांमध्ये या चॅलेंजवर बंदी घालण्यात आली असून भारतातही उत्तर प्रदेश पोलिसांपासून मुंबई पोलिसांनी हे चॅलेंज न स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. आता हे कीकी चॅलेंज म्हणजे काय आणि पोलिस या चॅलेंजविरुद्ध का मैदानात उतरले आहेत हे जाणून घेऊयात.

किकी चॅलेंज म्हणजे काय?

सध्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या कीकी चॅलेंजने धुमाकूळ घालता आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याने चालू गाडीमधून खाली उतरून हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचे आणि काही अंतर गेल्यावर पुन्हा चालू गाडीत येऊन बसायचे. हे सगळं करताना गाडीच्या फ्रण्टसीटवरील व्यक्ती म्हणजे जी गाडी चालवत असते ती नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करते. जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्कने गायलेल्या इन माय फिलींग्स गाण्यातील पहिल्या कडव्यातील चालीवर हा डान्स केला जातो. या गाण्यातील पहिल्या कडव्यातील बोल किकी डू यू लव्ह मी असे असल्याने या चॅलेंजला कीकी चॅलेंज असे नाव पडले आहे. अनेकांनी #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच हे चॅलेंज काही देशांमध्ये इन माय फिलींग्स चॅलेंज नावाने ओळखले जात असल्याने या अशा धोकादायक डान्सचे व्हिडीओ #InMyFeelingsChallenge हा हॅशटॅग वापरूनही शेअर केले जात आहेत.

सुरुवात कुठून झाली

विनोदी अभिनेता शॅगी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरून डर्कच्या इन माय फिलींग गाण्यावर ठेका धरत केलेल्या डान्सचा व्हिडीओ महिनाभरापूर्वी पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये शॅगीने गाडीचा वापर न करता केवळ एका जागी डान्स केला होता. मात्र शॅगीचा मित्र आणि अमेरिकेतील फुटबॉलपटू ओडेल बेकमह ज्युनियर याने याच गाण्यावर गाडीतून उतरून डान्स करत पुन्हा गाडीत येऊन बसल्याचा व्हिडीओ पोस्ट केला.

डर्क या चॅलेंजबद्दल काय म्हणतो

या गाण्याचा मूळ गायक डर्क याने या चॅलेंजबद्दल कोणतेही औपचारिक वक्तव्य केले नसले तरी गाण्याला या चॅलेंजमुळे मिळणारे यश पाहता त्याने शॅगीबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अमेरिकन चार्ट लिस्टवर गाणे पहिल्या क्रमांकाला गेल्यानंतर डर्कने हा फोटो पोस्ट केला.

धोकादायक चॅलेंज

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये तर्कबुध्दीचा अभाव दिसून येतो अशी टिका अनेकदा होते. अशाच प्रकारचे हे चॅलेंज असल्याचे जगभरातील अनेक शहरांमधील पोलिसांचे म्हणणे आहे. चालू गाडीतून उतरून गाडीच्या बाजूला नाचत राहणे जीवाला धोकादायक असल्याने अनेक शहरांमधील पोलिस खात्यांने आपल्या सोशल मिडिया हॅण्डल्सवरून तसेच पत्रके काढून जाहीर केले आहे.

पोलिस म्हणतात हा गुन्हाच

फ्लोरिडामधील पोलिसांनी तर अशाप्रकारे चालू गाडीतून बाहेर येऊन नाचणाऱ्यांना चक्क एक हजार डॉलरचा (भारतीय मुल्यानुसार ६५ हजारहून अधिक रुपये) दंड केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

तर स्पेन, अमेरिका, युएई आणि मलेशियाबरोबरच इतर काही देशांमधील महत्वाच्या शहरांमध्ये या चॅलेंजवर चक्क बंदी घालण्यात आली आहे. काही जणांना हे चॅलेंज करताना गंभीर दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात काय स्थिती

या चॅलेंजने भरातीय नेटकऱ्यांवरही गारुड करायला सुरवात केली असून काही सेलिब्रिटीजने हे चॅलेंज पुर्ण करुन त्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहे. आत पोलिसांनी हे चॅलेंज अधिक व्हायरल होण्याआधीच सोशल मिडियावरून या चॅलेंजबद्दल जागृकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सोशल कॅम्पेन सुरु केली आहेत.

मुंबई पोलिस या चॅलेंजबद्दल केलेल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘हा फक्त तुमच्या जीवाला धोका आहे असे नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे इतरांच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. लोकांना अशाप्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचे थांबवा नाहीतर कारवाईसाठी तयार राहा’ या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी #DanceYourWayToSafety आणि #InMySafetyFeelingsChallenge हे हॅशटॅग वापरले आहेत.

मुंबई पोलिस कायमच सुरक्षित रस्ते प्रवासाबद्दलचे ट्विट करताना पहायला मिळतात.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनीही एक मजेदार ट्विट करुन ही असली चॅलेंज न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी थेट पालकांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘किकी तुमच्या मुलांवर प्रेम करते की नाही ठाऊक नाही तुम्ही नक्कीच करत असाल. म्हणूनच कीकी चॅलेंज वगळता तुमच्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानात त्यांच्याबरोबर उभे राहा.’ पोलिसांनी #KiKiHardlyAChallenge हा हॅशटॅग वापरला आहे.

कोणत्या भारतीय सेलिब्रिटीजने हे चॅलेंज पूर्ण केले

भारतातील बॉलिवूड तसेच टीव्हीवरील कलाकारांपैकी नोरा फतेही, अदा शर्मा आणि प्रियंका शर्मा यांनी अशाप्रकारे चालू गाडीतून उतरून नाचण्याचा व्हिडीओ शूट करून तो आपल्या सोशल मिडिया अकाऊण्टवरून पोस्ट केला आहे.