पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तैनात केले आहे. या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा सहभाग करण्यात आला आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडत आहेत.

आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून स्पेनमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी (DMK MP Kanimozhi Karunanidhi) यांनी केले. सोमवारी माद्रिदमध्ये प्रवासी भारतीयांच्या गटाला त्यांनी संबोधित केले. यादरम्यान, एका परदेशी व्यक्तीने त्यांना विचारले की, “भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी आणि त्याबाबत त्यांची भूमिका काय आहे?” या प्रश्नाचे उत्तर कनिमोळी यांनी अत्यंत हुशारीने दिले जे ऐकून तेथे टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, भारताच्या राष्ट्रीय भाषा कोणती या प्रश्नाचे उत्तर देतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

“भारताची राष्ट्रीय भाषा एकता आणि विविधता आहे. हाच संदेश हे शिष्टमंडळ जगासमोर घेऊन येत आहे आणि तीच आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,” असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि केंद्र सरकारमध्ये भाषेवरून, विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० मधील त्रिभाषिक सूत्राबाबत अलिकडेच झालेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता.

दहशतवादाबाबतच्या प्रश्नावर, त्या पुढे म्हणाल्या, “आपल्या देशात अजून खूप काही करणे बाकी आहे आणि आम्हाला ते पूर्ण करायचे आहे. दुर्दैवाने, आपले लक्ष विचलित केले जात आहे. आपल्याला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे, असे युद्ध जे पूर्णपणे अनावश्यक आहे”.

द्रमुक खासदार पुढे म्हणाल्या की,”भारत एक सुरक्षित ठिकाण आहे आणि सरकार काश्मीर सुरक्षित ठेवेल.”

“भारतीय म्हणून, आपल्याला हा संदेश स्पष्ट करावा लागेल की, भारत सुरक्षित आहे. ते सर्व प्रयत्न करू शकतात, ते भारताला मार्गातून हटवू शकत नाहीत. आम्ही काश्मीर सुरक्षित राहावे याची खात्री करू ,”असे त्या म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या पाच देशांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा स्पेन आहे, त्यानंतर ते भारतात परततील. संघात समाजवादी पक्षाचे खासदार राजीव कुमार राय, भाजपचे ब्रिजेश चौटा, आपचे अशोक मित्तल, राजदचे प्रेमचंद गुप्ता आणि माजी राजनयिक मंजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे.