Pakistani Woman Spends 10 Hours At Mumbai Airport Video : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या बातम्या रोज ऐकायला मिळतात. पण, सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती मुंबई विमानतळावर १० तास घालवताना कसा अनुभव आला याविषयी सांगताना दिसतेय. लंडनहून नेपाळला प्रवास करणाऱ्या या पाकिस्तानी महिलेचा मुंबई विमानतळावरील थांबा आता एक चर्चेचा विषय बनला आहे.
तिच्या बॅगेत सापडलेल्या एका ‘संशयास्पद’ वस्तूपासून ते भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वागणुकीपर्यंत या पाकिस्तानी महिलेने अशा सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्याची फार कमी लोकांनी कल्पना केली असेल. तिला मुंबई विमानतळावर खरोखरच अडचणींचा सामना करावा लागला की भारतीय आदरातिथ्याने ती प्रभावित झाली, नेमकं तिच्याबरोबर घडलं काय जाणून घेऊ…
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० तास घालवल्याचा अनुभव सांगणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनहून नेपाळला प्रवास करणाऱ्या या महिलेचे मुंबईत कनेक्टिंग फ्लाइट होते. तिच्या पाकिस्तानी पासपोर्टमुळे ती सुरुवातीला घाबरली होती, पण शेवटी जे घडले त्याने ऑनलाइन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतातील विमान प्रवासाविषयी सांगताना ती म्हणाली की, प्रवासाबाबत मी खूप चिंतीत होती, मला भीती वाटत होती, पाकिस्तानी नागरिक असल्याने मुंबईतील ट्रान्झिटदरम्यान तिला अडचणी येऊ शकतात. ती तिच्या सुरक्षेबद्दल आणि नियमांविषयी इतकी चिंतेत होती की, तिने प्रवासाच्या एक महिना आधीच इंडिगो एअरलाइन्सशी संपर्क साधला. यावेळी एअरलाइन्सने तिला आश्वासन दिले की, जोपर्यंत ती विमानतळाच्या आवाराबाहेर जात नाही, तोपर्यंत तिला कोणतीही अडचण येणार नाही.
तिने १० तासांच्या लेओव्हरदरम्यान विमानतळावर आराम केला, जेवण केले. पण, जेव्हा तिला सुरक्षा तपासणीसाठी चेक पॉइंटवर बोलवले तेव्हा तिच्या प्रवासाला एक वेगळे वळण लागले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांना तिच्या बॅगेत एक ‘संशयास्पद’ वस्तू आढळली,
त्या महिलेने सांगितले की, ती कोणतीही धोकादायक वस्तू नव्हती, ती केवळ एक ‘पॉवर बँक’ होती. भारतीय नियमांनुसार, चेक-इन केलेल्या सामानात पॉवर बँक नेण्यास परवानगी नाही. त्या महिलेने सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला नम्रपणे ती वस्तू बाहेर काढण्यास सांगितले, ज्यामुळे तिची भीती दूर झाली.
पाकिस्तानी महिलेने तिच्या व्हिडीओमध्ये, मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या आदरातिथ्याची प्रशंसा केली. तिने सांगितले की तिचा अनुभव ‘अद्भुत’ होता आणि विमानतळाच्या आतूनही मुंबई इतक्या जवळून पाहता आली यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने लिहिले, “सर्व कर्मचारी खूप चांगले होते आणि मला खूप मजा आली.”
हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो युजर्सनी पाहिला, ज्यावर ते आता भरभरून कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत. एकाने म्हटले की, तुमचा अनुभव चांगला होता हे ऐकून आनंद झाला. आपल्याला अशा खऱ्या गोष्टी सांगणाऱ्यांची गरज आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मुंबईत तुमचे स्वागत आहे. आशा आहे की, तुम्ही इथला वडा पाव खाल्ला असेल.” आणखी एका युजरने कमेंट केली, “स्वागत आहे ताई.”
