What to Do if You Fall in Water: अलीकडे जबलपूरमधील क्रुझशी संबंधित घटनेनंतर पाण्यातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका क्षणातील निष्काळजीपणा किंवा घाबराट किती मोठा धोका निर्माण करू शकते, याची जाणीव या घटनेतून अनेकांना झाली. विशेषतः ज्यांना पोहता येत नाही, त्यांच्यासाठी अशा परिस्थितीत काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो. अशाच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात पाण्यात पडल्यावर स्वतःला कसं वाचवायचं याची अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे. ही माहिती अनेकांसाठी जीव वाचवणारी ठरू शकते.
उन्हाळा असो किंवा पावसाळा… पाण्याजवळ गेल्यावर अनेकदा मजा करण्याच्या नादात लोक खोल पाण्यात उतरतात. पण ज्यांना पोहता येत नाही, त्यांच्यासाठी ही मजा कधी जीवघेणी ठरू शकते. अचानक पाय घसरला, पाणी खोल निघालं… आणि पुढच्या क्षणी भय! अनेक अपघातांची सुरुवात याच क्षणापासून होते. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला अतिशय सोप्या पद्धतीने सांगते की, जर तुम्हाला पोहता येत नसेल तरीही तुम्ही पाण्यात स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकता. ही माहिती ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत.
पहिलं पाऊल- घाबरू नका!
पाण्यात पडताच बहुतेक लोक घाबरतात आणि हाच सर्वांत मोठा धोकादायक क्षण ठरतो. घाबरल्यामुळे श्वासोच्छ्वास वेगाने व्हायला लागतो, शरीराचा ताळमेळ बिघडतो आणि बुडण्याची शक्यता वाढते. म्हणूनच सर्वांत आधी स्वतःला शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मन स्थिर ठेवलं, तर पुढची पावलं योग्यरीत्या उचलता येतात.
शरीर सरळ ठेवा- संतुलन राखा
तज्ज्ञ सांगतात की, पाण्यात गेल्यावर शरीर सरळ (उभ्या स्थितीत) ठेवण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती संतुलन राखण्यासाठी मदत करते. शरीराला स्थिर ठेवलं, तर पाण्यात टिकून राहणं सोपं होतं.
पाय हलकेच हलवा- घाई करू नका
पाय हळूहळू हलवणं हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. जसं आपण जमिनीवर हलक्या पावलांनी चालतो, तसं पाण्यात पाय हलवत राहा.
अनेक जण घाबरून हात-पाय जोरात हलवतात; पण त्यामुळे शरीराचा तोल बिघडतो आणि धोका वाढतो. शांतपणे, नियंत्रित हालचाली केल्यास पाणीच तुम्हाला वर ठेवण्यास मदत करतं.
श्वासावर नियंत्रण- जीवन वाचवण्याची गुरुकिल्ली
घाबरल्यावर श्वास वेगाने चालू होतो, ज्यामुळे शरीर लवकर थकते. म्हणूनच खोल आणि हळूहळू श्वास घेणं महत्त्वाचं आहे. शांत श्वासोच्छ्वासामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही जास्त वेळ पाण्यावर टिकून राहू शकता.
हातांचा योग्य वापर- लहानसा उपाय, मोठा फरक
हात थोडेसे पसरून ठेवले, तर शरीराला अधिक संतुलन मिळतं. त्यामुळे फ्लोटेशन वाढतं म्हणजे शरीर पाण्यावर जास्त वेळ तरंगत राहतं. हा छोटा उपायही जीव वाचवण्यात मदत करू शकतो.
ही ट्रिक उपयुक्त; पण पोहण्यास शिकणं अधिक महत्त्वाचं!
ही पद्धत आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरू शकते; पण याचा अर्थ असा नाही की, पोहण्यास शिकणं गरजेचं नाही. तज्ज्ञ नेहमीच सांगतात की, पोहणं हे एक महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे. विशेषतः लहान मुलांना लहानपणापासून पाण्याबद्दल जागरूक करणे आणि त्यांना पोहण्यास शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि संकटात ते स्वतःला सावरू शकतात.
येथे पाहा व्हिडीओ
लक्षात ठेवा- पाण्यात टिकून राहण्याचा पहिला नियम म्हणजे शांत राहणं! योग्य वेळी योग्य पाऊल उचललं, तरच जीव वाचवणं शक्य आहे.
