जुन्या चित्रपटांमधील गाणी रिमिक्स करुन वापरण्याचा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये तसा काही नवा नाही. अगदी तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर अनेक जुन्या गाण्यांची रिमिक्सने वाट लावली आहे. मात्र मुंबई पोलिसांनाही थेट १९७५ साली प्रदर्शित झालेल्या खेल खेल मे या चित्रपटातील गाणं पोस्ट करत एक भन्नाट मेसेज तरुणाईला दिला आहे. या चित्रपटातील एक मैं और एक तू या गाण्यातील काही सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केलला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना भन्नाट कॅप्शन दिली आहे. तुमच्या ग्रुपमधील एखादा पार्टी अॅनिमल म्हणजेच पार्टी करण्यासाठी सदा उत्सुक असणारा एखादा मित्र तुम्हाला या करोनाच्या काळात भेटण्यासंदर्भात सांगत असेल तर तुम्ही काय म्हणाल अशी कॅप्शन या व्हिडिओ दिली आहे. या कॅफ्शनसहीत “दुरिया वक्त आने पर मिटाऐंगे” अशी ओळ असणारी क्लिप पोलिसांनी पोस्ट केली आहे.
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दोन तासांमध्ये २० हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकांनी पोलिसांच्या या क्रिएटीव्हीटीला सलाम केला असून अगदी हलक्या पुलक्या पद्धतीने महत्वाचा मेसेज देणाऱ्या पोलिसांचे कौतुक केलं आहे.
