अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा अनेक अर्थाने चर्चेचा विषय ठरला. कोणासाठी राजकिय दृष्टीने महत्त्वाचा होता तर कोणाला आपल्या भविष्याची चिंता होती. पण सोशल मीडियावर २४ तास सक्रिय असणा-या नेटीझन्सना मात्र याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. या सोहळ्यात मजेशीर काही घटना पाहायला मिळतायत का? यात त्यांचे लक्ष होते. त्यामुळे व्हायरल करायला या नेटीझन्सला बरेच काही मिळाले. आता हेच बघा ना! नव्या राष्ट्राध्यक्षांचे आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसच्या पाय-यांवर उभे होते. पहिल्यांदा ट्रम्प आले पाठोपाठ पत्नी मेलानियाही आली. शिष्टाचाराचा भाग म्हणून तिने ओबामा दाम्पत्यांसाठी भेटवस्तू आणली होती. ही भेटवस्तू स्विकारल्यानंतर मिशेल यांच्या चेह-यावर जो गोंधळ उडाला तो काही कॅमेराच्या नजरेतून लपला नाही. याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो वेगळाच पण मेलानिया यांनी नक्की काय भेटवस्तू आणली असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती.

VIRAL VIDEO : बिल क्लिंटनची नजर कोणावर खिळली? इवांका की मेलानिया?

अमेरिकन शिष्टाचाराचा भाग म्हणून अमेरिकेची फर्स्ट लेडी या नात्याने मेलानियाने ओबामा दाम्पत्यांसाठी भेटवस्तू आणली. फिक्कट निळ्या रंगाचा बॉक्स मेलानियाने मिशेलच्या स्वाधीन केला. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या बॉक्समध्ये काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. पण हे कोडे सोडवण्यात काहीसे यश आले. मेलानिया यांनी मिशेल यांना टिफनी अँड कंपनीचा बॉक्स दिला. हा लक्झरी ब्रॅड आहे. जो महागडे दागिने, अत्तर, चामड्याच्या वस्तू अशा अनेक वस्तू विकतो. अमेरिकेतल्या एका वेबसाईटनुसार मेलानिया यांनी ओबामा दाम्पत्याला या कंपनीची फोटो फ्रेम भेट दिली आहे. ही फ्रेम चांदीची असल्याचे म्हटले जाते. या कंपनीच्या अधिकृत बेवसाईटवर चांदीच्या फोटो फ्रेम आहेत त्यामुळे या बॉक्समध्ये फोटो फ्रेम असल्याचे म्हटले जाते. या फोटो फ्रेमची किंमत भारतीय मुल्यांप्रमाणे ५० हजारांहूनही अधिक असल्याचे समजेत. या भेटवस्तूबद्दल न्यूयॉर्क टाइम्सने या कंपनीला विचारले असता त्यांनी मात्र याबद्दल बोलण्यास नकार दिला. टीफनी अँड कंपनीला याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवायचे असले तरी अनेकांनी मात्र ही भेटवस्तू काय आहे याचे कोडे आधीच उलगडले.

ट्रम्प यांच्या शपथ विधी सोहळ्याच्या आधी व्हाईट हाऊसच्या पाय-यांवर ओबामा दाम्पत्य नव्या राष्ट्राधक्षांच्या स्वागतासाठी उभे होते. ट्रम्प पोहोचल्यानंतर त्यांच्यामध्ये औपचारिक बोलणे झाले. यावेळी मेलानिया पुढे येत त्यांनी मिशेलच्या हातात एक भेटवस्तू दिली. त्यामुळे पुढचा काही काळा मिशेल गोंधळलेल्या होत्या. हातात भेटवस्तू घेऊ की फोटो काढू अशी त्याची द्विधा मनस्थिती झाली होती आणि हा गोंधळ कॅमेरातही कैद झाला होता. याची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.