नागपूर : व्हॉट्सॲप वापरणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी १ ऑक्टोबरपासून मेसेज पाठवणे महाग होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. एका मेसेजसाठी सुमारे १४ पैसे आकारले जाणार असल्याचा दावा या चर्चेत केला जात आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरणाऱ्या सामान्य युजर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या बदलाचा संबंध वैयक्तिक व्हॉट्सॲप खात्यांशी नसून व्यावसायिक कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या WhatsApp Business Platform/API शी आहे.
मग १४ पैसे कुणाला द्यावे लागणार?
मेटाकडून व्यावसायिक ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या कंपन्यांसाठी बिलिंगच्या नियमांमध्ये बदल केला जात आहे. १ ऑक्टोबरपासून पात्र सर्व्हिस आणि युटिलिटी मेसेजसाठी कंपन्यांना शुल्क लागू होणार आहे. याचा अर्थ असा की एखाद्या बँकेकडून व्यवहाराची माहिती, ई-कॉमर्स कंपनीकडून ऑर्डर अपडेट किंवा अन्य सेवेशी संबंधित स्वयंचलित संदेश व्हॉट्सॲपवर पाठवला जात असेल, तर त्या संदेशासाठी संबंधित कंपनीला मेटाला शुल्क द्यावे लागू शकते. भारतामध्ये जीएसटीचा विचार केल्यानंतर हा खर्च सुमारे १४ पैसे प्रति मेसेज होऊ शकतो.
२४ तासांची मोफत विंडो काय?
व्हॉट्सॲप बिझनेसच्या सध्याच्या व्यवस्थेत ग्राहकाने कंपनीशी संवाद साधल्यानंतर ठरावीक कालावधीत कंपनीकडून केले जाणारे काही सेवा-संबंधित संदेश वेगळ्या शुल्काशिवाय पाठवता येतात. नव्या व्यवस्थेत या बिलिंग पद्धतीत बदल केला जात आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्येक व्हॉट्सॲप मेसेजसाठी आता पैसे द्यावे लागतील, असा अजिबात नाही.
पहिल्या १,००० मेसेजचे काय ?
व्यावसायिक खात्यांसाठी दरमहा पहिल्या १,००० पात्र सर्व्हिस मेसेजसाठी शुल्कमुक्त मर्यादा असल्याचे या नव्या व्यवस्थेबाबत सांगितले जात आहे. त्यानंतर संबंधित मेसेजच्या प्रकारानुसार शुल्क आकारले जाऊ शकते. म्हणजेच हा बदल मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना स्वयंचलित संदेश पाठवणाऱ्या कंपन्यांच्या खर्चावर परिणाम करणारा आहे.
मार्केटिंग मेसेज वेगळे
सेवा किंवा युटिलिटी संदेश आणि मार्केटिंग संदेश यांच्यात मेटाच्या व्यावसायिक मेसेजिंग व्यवस्थेत फरक केला जातो. जाहिराती, ऑफर्स किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाठवले जाणारे मार्केटिंग संदेश आधीपासूनच स्वतंत्र शुल्काच्या श्रेणीत येतात. त्यामुळे ‘व्हॉट्सॲपवरील प्रत्येक मेसेजला १४ पैसे’ असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
सामान्य व्हॉट्सॲप युजरचे काय ?
तुम्ही मित्रांना मेसेज पाठवत असाल, कौटुंबिक ग्रुपवर चॅट करत असाल, व्हॉइस किंवा व्हिडीओ कॉल करत असाल अथवा स्टेटस वापरत असाल, तर या बदलामुळे तुम्हाला प्रति मेसेज पैसे मोजावे लागणार नाहीत. म्हणजेच वैयक्तिक व्हॉट्सॲप वापरासाठी १ ऑक्टोबरपासून अचानक ‘१४ पैसे प्रति मेसेज’ असे कोणतेही शुल्क लागू होत नाही.
मग ही चर्चा का सुरू झाली?
‘व्हॉट्सॲप पेड होणार’, ‘प्रत्येक मेसेजसाठी १४ पैसे’ अशा स्वरूपात माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने संभ्रम निर्माण झाला. प्रत्यक्षात व्यावसायिक कंपन्यांसाठीच्या WhatsApp Business API मधील शुल्करचनेतील बदलाचा संबंध सामान्य वापरकर्त्यांशी जोडला गेला. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यासाठी पैसे मोजावे लागतील, या दाव्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तुमचे वैयक्तिक चॅटिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे; बदलाचा आर्थिक परिणाम मुख्यतः व्हॉट्सॲपचा व्यावसायिक वापर करणाऱ्या कंपन्यांवर होणार आहे.
