WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सोपा आणि स्मार्ट करण्यासाठी व्हॉट्सॲप आणखी एका नवीन फीचरवर काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर अनेकांची एक मोठी अडचण कायमची दूर होऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी वेगळं कॅलेंडर किंवा रिमाईंडर अॅप वापरण्याची गरजही भासणार नाही.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा मित्र, नातेवाईक किंवा सहकाऱ्यांचा वाढदिवस लक्षात राहत नाही. त्यामुळे शुभेच्छा द्यायच्या राहून जातात आणि नंतर खंत वाटते. आता मात्र व्हॉट्सॲप हीच समस्या सोडवण्याच्या तयारीत आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, ते लवकरच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमकं हे फीचर काय आहे? ते कसं काम करणार? आणि कोणाला त्याचा सर्वाधिक फायदा होणार? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
याचं उत्तर म्हणजे व्हॉट्सॲपचं नवीन ‘बर्थडे रिमाईंडर’ फीचर. या फीचरमुळे तुमच्या संपर्क यादीतील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आला की, व्हॉट्सॲप स्वतः तुम्हाला अॅपमध्ये सूचना (Notification) देणार आहे. त्यामुळे वाढदिवस विसरण्याची शक्यता खूपच कमी होईल.
सूचना मिळाल्यानंतर तुम्ही थेट त्या व्यक्तीच्या चॅटमध्ये जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही पाठवू शकणार आहात. म्हणजेच वेगळं कॅलेंडर तपासण्याची किंवा अलार्म लावण्याची गरज उरणार नाही.
व्हॉट्सॲपमध्ये तयार होणार स्वतंत्र विभाग
समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपमध्ये ‘Birthdays’ नावाचा स्वतंत्र विभागही तयार केला जात आहे. या विभागात तुमच्या सेव्ह केलेल्या संपर्कांपैकी कोणाचा वाढदिवस कधी आहे, कोणाचा वाढदिवस जवळ आला आहे, याची माहिती एका ठिकाणी पाहता येणार आहे.
त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाढदिवसाच्या तारखा शोधण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा आधार घ्यावा लागणार नाही.
पण हे फीचर सर्वांसाठी लगेच काम करेल का?
या फीचरचा वापर करण्यासाठी संबंधित संपर्क क्रमांक असलेल्या व्यक्तीची जन्मतारीख व्हॉट्सॲपकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे. काही अमेरिकन राज्यांमध्ये वयाच्या पडताळणीसाठी व्हॉट्सॲप आधीपासूनच वापरकर्त्यांची जन्मतारीख नोंदवतं. त्यामुळे त्या भागात हे फीचर सहजपणे कार्यान्वित होऊ शकतं.
मात्र, ज्या देशांमध्ये व्हॉट्सॲप जन्मतारीख गोळा करीत नाही, तेथे वापरकर्त्यांनी भविष्यात स्वतः जन्मतारीख नमूद केल्यासच हे फीचर पूर्ण क्षमतेनं वापरता येणं शक्य होणार आहे.
गोपनीयतेबाबत काय?
सध्या या फीचरमध्ये गोपनीयतेसंदर्भातील (Privacy) कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत. म्हणजेच तुमची जन्मतारीख कोण पाहू शकेल किंवा ती लपवण्याचा पर्याय अद्याप देण्यात आलेला नाही.
मात्र, हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करण्यापूर्वी व्हॉट्सॲपकडून आवश्यक असलेला गोपनीयता नियंत्रण (Privacy Controls) व्यवस्थेचा पर्याय जोडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या कुठे दिसलं हे फीचर?
हे फीचर WhatsApp for Android Beta 2.26.27.3 या बीटा आवृत्तीत आढळून आले आहे. व्हॉट्सॲपमधील नवीन फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मनं याबाबतची माहिती दिली आहे.
मात्र, Meta किंवा व्हॉट्सॲपनं अद्याप या फीचरची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच हे फीचर Android च्या सर्व वापरकर्त्यांसाठी किंवा iPhone (iOS) वर नेमकं कधी उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
तरीही जर हे फीचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध झालं, तर व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव आणखी सोपा आणि उपयुक्त होणार आहे. विशेषतः मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी आता वेगळ्या अॅपची गरज उरणार नाही. व्हॉट्सॲपच तुम्हाला योग्य वेळी आठवण करून देईल आणि एका क्लिकमध्ये शुभेच्छाही पाठविता येतील.
