Pune Cycling Viral Video :पुण्यात सध्या सुरू असलेल्या ‘बाजाज पुणे ग्रँड टूर२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सर्वत्र गँड टूरच्या स्पर्धकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण या स्पर्धकांपेक्षा एका पुणेरी काकांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुणेरी काका अंगात पांढरा सदरा अन् डोक्यावर गांधी टोपी…पारंपरिक पेहरावात आणि देशी सायकलवरून आंतरराष्ट्रीय सायकलपटूंमागे जाताना दिसत आहेत.
स्पर्धेच्या मार्गावरून वेगात जाणाऱ्या व्यावसायिक सायकलपटूंनंतर, अचानक पांढरा सदरा-पायजमा परिधान केलेले काका त्याच रस्त्यावरून सायकल चालवत असल्याचं दृश्य पाहून उपस्थित नागरिक क्षणभर थक्क झाले. अनेकांना ते स्पर्धेतीलच स्पर्धक असल्याचा भास झाला. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक टाळ्या वाजवत, जोरजोरात ओरडत त्यांना प्रोत्साहन देताना दिसले.
हा व्हिडिओ काही वेळातच इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर)वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. “वय फक्त आकडा आहे”, “खरा पुणेरी स्वॅग”, “काका म्हणजे प्रेरणा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर खरी माहिती समोर आली. हे काका प्रत्यक्षात स्पर्धेत सहभागी नव्हते, तर आपल्या नेहमीच्या मार्गानेच सायकलवरून जात होते. स्पर्धक गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग ते त्या रस्त्यावरून गेल्यामुळे गैरसमज निर्माण झाला.
या काकांचं नाव बेलाजी पात्रे असून, त्यांचा साधेपणा, आत्मविश्वास आणि सायकलप्रेम यामुळे ते रातोरात सोशल मीडिया स्टार झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याची जुनी सायकल संस्कृती, साधेपणा आणि उत्साही वृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
