River-Cleaning Youth Bittu Tabahi : नदी प्रदूषण ही भारतासमोरील अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. नदीमध्ये अंघोळ करणे, कचरा टाकणे तसेच सांडपाणी सोडणे यामुळे अनेक नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असला, तरी अनेकदा या समस्येकडे सरकार आणि नागरिक दोघांकडूनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. सरकारवर आरोप केले जात असताना अनेक नागरिक स्वतःही नदीत कचरा टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळते.अशा परिस्थितीत, मध्य प्रदेशातील एका तरुणाने नदी प्रदूषणाविरोधात स्वतः पुढाकार घेत केलेले काम सध्या देशभर चर्चेचा विषय ठरले आहे.

मध्य प्रदेशातील एका छोट्या शहरातील २० वर्षीय बिट्टू तबाही याने अत्यंत प्रदूषित झालेली ‘अजणारा नदी’ स्वत:च स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. हा तरुणाने संपूर्ण नदी स्वच्छ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी त्याने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे काम केल्याचा आरोप झाला. पण त्याच्या प्रमाणिक प्रयत्नांची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली.

आनंद महिंद्रांनी यांनी केले तरुणाचे कौतुक

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि आपल्या चाहत्यांसह ते अनेक प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात. त्यांच्या #MondayMotivation पोस्टमध्ये बिट्टूच्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतूक केले.

एका व्हायरल एक्स पोस्टमध्ये, या महिंद्रा यांनी लिहिले, “मध्य प्रदेशातील बियावरा येथील या तरुणावर केवळ सोशल मीडिया व्ह्यूज मिळवण्यासाठी नदीचा काही भाग स्वच्छ केल्याचा दावा केल्याबद्दल टीका झाली होती. बरं, आपण सहसा तक्रार करतो की सोशल मीडिया अर्थपूर्ण गोष्टींऐवजी क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देतो. त्यामुळे जर ‘लाईक्स’ मिळवण्याची इच्छा एखाद्या चांगल्या कामासाठी एक शक्ती बनू शकत असेल, तर मला ते मान्य आहे… #MondayMotivation आहे.”

पोस्टसोबत, महिंद्राने बिट्टू प्रदूषित नदी स्वच्छ करत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला.

हा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला, कारण अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बिट्टूच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “बहुतेक कर्मचारी कौतुक आणि फायद्यांसाठी काम करतात, त्यामुळे त्याने खरोखरच चांगले काम केले आहे. त्याने एक नागरिक म्हणून उत्तम काम केले आहे, त्यामुळे कोणत्याही अटी-शर्तींशिवाय त्याचे कौतुक केलेच पाहिजे,” असे एका ‘X’ वापरकर्त्याने लिहिले.

“आदर करा. जर लाईक्सच्या मागे लागल्याने नद्या स्वच्छ होत असतील, तर त्यात कमीपणा नाही, उलट असे काम अधिक व्हायला हवे आहे. हेतूंपेक्षा प्रत्यक्ष परिणाम अधिक महत्त्वाचा आहे,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका वापरकर्त्याने केली. “लोक सोशल मीडिया लाईक्ससाठी चांगले काम करत असले तरी, आपण त्याचा आदर केला पाहिजे. चांगले काम कोणत्याही स्वरूपात असले तरी ते स्वीकारार्ह आहे,” अशी प्रतिक्रिया एका तिसऱ्या वापरकर्त्याने दिली.

बिट्टू तबाही कोण आहे?

मध्य प्रदेशातील बियाओरा येथे जन्मलेल्या बिट्टू तबाहीचे इंस्टाग्रामवर एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या व्हिडिओंमध्ये तो अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणांपासून ते स्थानिक जलमार्गांपर्यंत सर्व काही स्वच्छ करताना दिसतो. काही साध्या साधनांच्या मदतीने अजणारा नदी हाताने स्वच्छ केल्यावर तो व्हायरल झाला; त्याने नदीतून प्लास्टिकचा कचरा, मलबा आणि शेवाळ वेगळे केले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याने २६ जानेवारी रोजी आपल्या मित्रांसोबत नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली, पण मित्रांनी मध्येच काम सोडून दिले. मात्र, बिट्टूने पुढाकार घेतला आणि नदीत उतरून प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढला. नदी स्वच्छ करण्यासाठी त्याला काही आठवडे लागले.