Kid’s Stair Slide Viral Video: सध्याच्या डिजीटल युगात खेळही डिजिटल झाले आहे. मैदानावर खेळण्याचे खेळही आता मोबाईल किंवा लॅपटॉपवर खेळता येतात. याशिवाय अफलातून ऑनलाईन गेम्स तर आहेतच. मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये हरवलेल्या नव्या पिढीला मैदानावर खेळण्याची खरी मज्जा माहितच नाही. अनेकांना मोबाईलशिवाय कसे खेळायचे किंवा कशी मज्जा करायची हे माहित नाही. अशा काळात जर कोणी मैदानावर किंवा घराबाहेर खेळताना दिसले तर त्यांच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.


सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो साध्या गोष्टींतून खेळ, मज्जा, धाडस आणि आनंद अनुभवत आहे, व्हिडीओमधील हा चिमुकला एका इमारतीसमोरील पायऱ्यांवर असलेल्या उतरावर घसरगुंडीप्रमाणे खेळत आहे. हे सामान्य दृश्य अनेकांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे. नव्या पिढीला खेळण्याचा खरा आनंद काय असतो हे देखील दर्शवत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की हा चिमुकला आधी पायऱ्या चढून उतराच्या टोकावर जातो. मात्र इतर मुलांसारखा सरळ बसून घसरण्याऐवजी तो थेट पाठीवर झोपतो आणि उलटा खाली घसरतो. विशेष म्हणजे, हा प्रकार करताना त्याचं संतुलन, आत्मविश्वास आणि सहजता पाहून अनेक प्रेक्षक थक्क झाले आहेत.

चिमुकल्याची स्टाइल पाहून नेटिझन्स हैराण

हा चिमुकला एकदाच नाही, तर वारंवार हाच प्रकार करत खेळतो आहे. प्रत्येक वेळी खाली आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वासपूर्ण हसरा भाव आणि ‘स्वॅग’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओ पोस्ट होताच अनेकांनी त्याची तुलना थेट स्टंटमॅनशी केली आहे.

एका युजरने गंमतीने लिहिलं, “हा पोरगा मोठा होऊन थेट एव्हरेस्ट सर करणार, ट्रेनिंग आत्ताच सुरू आहे!”

तर दुसर्‍याने कमेंट केली, “हे तर प्रो लेव्हल स्टंट आहे, आम्ही तर सरळ बसायलाही घाबरायचो.”

काहींनी या व्हिडीओला “स्वॅग लेव्हल: Infinite” असंही म्हटलं आहे.

‘मोबाईलशिवायची मुलं अशीच असतात…’

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ मोबाईलशिवाय मुलांचे जग असेच सुंदर असते.”

मात्र त्याबरोबर अनेक पालकांनी हसत-हसत चिंता व्यक्त केली आहे. “आईने पाहिलं तर चप्पलन मार बसू शकतो,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

बालविकास तज्ज्ञांच्या मते, मुलं खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची चाचणी घेत असतात. हा व्हिडीओ केवळ मनोरंजन करणारा नसून, मुलांची कल्पकता, निर्भयता आणि वेगळ्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता अधोरेखित करतो. अर्थात, अशा खेळांमध्ये सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.