‘त्यांनी इंग्रजीची भीती घालवली होती’

या शाळेतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता. ही भीती दूर घालवण्यात सर्वात मोठा वाटा होता तो भगवान सरांचा

तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे.

दोनएक दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. ‘शिक्षक असावा तर असा’ असं कौतुक अनेकांनी हा फोटो पाहून केलं. आयुष्यात पैसे कमावणं महत्त्वाचं नसतं तर तुम्ही जीव लावणारी माणसंही कमावली पाहिजे असं म्हणतात. २८ वर्षीय भगवान यांनी हे सिद्ध करू दाखवलं. तामिळनाडूतील वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवायचे. चार वर्षांपूर्वी ते या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. अनेक विद्यार्थ्यांसारखा या शाळेतील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी भाषेचा न्यूनगंड होता. इंग्रजीची भीती या मुलांनाही होती. पण ही भीती दूर घालवण्यात भगवान सरांचा वाटा सर्वात मोठा होता, म्हणूनच अल्पावधितच ते सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक झाले होते.

या गावातील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातले आहेत. कोणाचे वडील शेतकरी आहे. तर कोणाची आई सफाई कामगार आहे तर कोणाचं आई-वडील मजूरी करून पोट भरत आहेत. या गरीब घरातून आलेल्या मुलांच्या स्वप्नांना भगवान यांनी दिशा दिली. ‘भगवान सरांनी इंग्रजीची भीती घालवली. आज इंग्रजी हा माझा सर्वात आवडता विषय आहे. त्यांनी नवीन पुस्तकांची ओळख मला करुन दिली. त्यांच्यामुळे कठीण वाटणाऱ्या इंग्रजी विषयात मी पास झालो. ‘ असं आठवीत शिकणारा कार्तिक सांगत होता.

‘आम्ही छोट्याशा खेडेगावात राहणारी मुलं आहोत. इंग्रजीचा न्यूनगंड आमच्यामध्येही होता. पण त्यांच्यामुळे आज मी इंग्रजीत रोजनिशी लिहू लागले. मुलाखत, लोकांशी संवाद साधताना इंग्रजी येणं गरजेचं आहे. आज आम्ही उत्तम इंग्रजी लिहू, वाचू, बोलू शकतो ते केवळ भगवान सरांमुळे’ चौदा वर्षांची काव्या सरांबद्दल भरभरून बोलत होती. या गावात राहणारे धनराज यांना दोन मुली आहेत. भगवान सरांची बदली झाल्यापासून त्यांच्या दोन्ही मुलींनी शाळेत जायला नकार दिला आहे. इतकंच नाही तर ज्या शाळेत भगवान सरांची बदली झाली आहे त्याच शाळेत आमचंही नाव घाला असा हट्ट या मुलींनी केला आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना धनराज यांनी माहिती दिली.

‘भगवान सर शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचे, पालकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. वर्गातील प्रत्येक मुलांच्या पालकांना ते ओळखायचे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल त्यांच्याशी बोलायचे, त्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकापलिकडचं होतं’, असंही काही शिक्षक सांगत होते. भगवान यांची बदली होऊ नये यासाठी अनेक पालकांनी प्रयत्नदेखील केले पण, नियमांपुढे कोणाचंही चालेना.

भगवान यांना मनावर दगड ठेवून बाहेर पडावं लागलं पण, ‘या विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजीची भीती आपण दूर केली, त्यांना वाचनाची गोडी लावली यातचं आपलं सर्वात मोठं यश आहे’ हे समाधान घेऊनच भगवान पुढच्या प्रवासाला निघाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Why bhagawan sir is so much important for veliagaram government high school student

ताज्या बातम्या