Why Does ChatGPT Often Choose 73: आजकाल एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र चर्चेत आहे. शाळेच्या प्रोजेक्टपासून ते कार्यालयीन कामांपर्यंत, तर कधी केवळ मनोरंजनासाठीही लाखो लोक ChatGPT चा वापर करत आहेत. पण गेल्या काही महिन्यांत इंटरनेटवर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. अनेक वापरकर्त्यांचा दावा आहे की ChatGPT ला १ ते १०० मधून एखादा यादृच्छिक म्हणजेच रँडम आकडा निवडायला सांगितल्यास ते वारंवार ७३ हा आकडा सांगते.
हा केवळ योगायोग आहे की, त्यामागे एखादं गुपित दडलं आहे? ChatGPT ला खरंच ७३ हा आकडा विशेष आवडतो का? की यामागे आणखी काही वेगळंच कारण आहे? या प्रश्नांनी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विशेष म्हणजे अनेक वापरकर्त्यांनी सामाजिक माध्यमांवर स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. काहींनी ChatGPT ला अनेक वेळा रँडम आकडा विचारल्याचा दावा केला आणि त्यांना वारंवार ७३ हेच उत्तर मिळाल्याचं सांगितलं. त्यामुळे हा विषय आणखी चर्चेत आला.
मात्र यामागचं खरं कारण ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं.
७३ हा आकडा इतका खास का वाटतो?
ChatGPT च्या स्पष्टीकरणानुसार माणसांना काही आकडे इतरांपेक्षा अधिक ‘रँडम’ वाटतात. उदाहरणार्थ- १, २, ९९ किंवा १०० यांसारखे आकडे खूप स्पष्ट वाटतात. ५० सारखा आकडाही अनेकांच्या लक्षात सहज येतो.
पण ७३ सारखा अभाज्य अंक लोकांना अधिक अनपेक्षित आणि वेगळा वाटतो. त्यामुळे एखादा आकडा निवडताना तो अधिक रँडम असल्याचा भास निर्माण होतो.
ChatGPT प्रत्यक्षात रँडम आकडा तयार करीत नाही?
हे ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. ChatGPT हे फासे टाकून किंवा लॉटरी काढून उत्तर देत नाही. ते प्रत्यक्षात शब्द आणि वाक्यांमधील नमुने ओळखून उत्तर तयार करते.
म्हणजेच तुम्ही रँडम आकडा विचारला तरी ChatGPT खऱ्या अर्थाने यादृच्छिक संख्या निर्माण करीत नाही. त्याऐवजी प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या नमुन्यांनुसार सर्वांत योग्य वाटणारं उत्तर देण्याचा प्रयत्न करते.
७३ मागे आहे लोकप्रिय मालिकेचाही संबंध?
यामागे आणखी एक रंजक कारण सांगितलं जातं. लोकप्रिय मालिका ‘द बिग बँग थिअरी’मध्ये शेल्डन कूपर हे पात्र ७३ ला ‘सर्वोत्तम संख्या’ असे संबोधते. हा प्रसंग इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता.
त्यानंतर ७३ या आकड्याचा उल्लेख अनेक संकेतस्थळे, चर्चा आणि सामाजिक माध्यमांवर वारंवार होऊ लागला. त्यामुळे ChatGPT च्या प्रशिक्षणादरम्यानही हा आकडा अनेकदा समोर आला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
आपल्या मनाचाही यात वाटा असण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, यामध्ये मानवी मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट एकदा लक्षात आली की, आपण ती पुन्हा पुन्हा शोधू लागतो.
उदाहरणार्थ- ChatGPT ने ४१, ६२ किंवा ८८ असे आकडे सांगितले, तर आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण ७३ हा अंक दिसला की, तो लगेच लक्षात राहतो. त्यामुळे ChatGPT ने कायम ७३ हा अंकच सांगितल्याचा भास निर्माण होऊ शकतो.
मग खरं उत्तर काय?
ChatGPT मध्ये असा कोणताही गुप्त नियम नाही की, तो नेहमीच ७३ हा आकडा निवडेल. मात्र, मानवी मानसशास्त्र, इंटरनेट संस्कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची कार्यपद्धती यांचा एकत्रित परिणाम म्हणून ७३ हा आकडा वारंवार समोर येऊ शकतो.
पुढच्या वेळी तुम्ही ChatGPT ला १ ते १०० मधून एखादा रँडम आकडा विचारलात आणि उत्तर ७३ आलं, तर आश्चर्यचकित होऊ नका. कारण- आता तुम्हाला त्या रहस्यामागचं कारण माहीत आहे.
