एखादा वेगळा पदार्थ किंवा नवी पद्धत वापरून हल्ली बर्‍याच क्लासिक, पारंपरिक खाद्यपदार्थांना एक मॉडर्न ट्विस्ट दिला जातो. अनेक खाऊगल्ल्या, फूडट्रक्स, कॅफेज, रेस्तराँमध्ये असे अनोखे ट्विस्ट्स दिलेले कित्येक पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत. उदा. मोतीचूर रबडी, स्टफ्ड इडली, तंदुरी चीझ ग्रिल्ड वडापाव, समोसा सॅन्डविच, चॉकलेट सॅन्डविच, शेवपुरी सॅन्डविच, फुलका टाकोज, पिझ्झा ढोकळा, तंदुरी चहा आणि बरंच काही. याच पार्श्वभूमीवर, आता असाच आणखी एक पदार्थ समोर आला आहे.

फूड ब्लॉगर अमर सिरोहीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमर सिरोहीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘डोसा’ या दक्षिण भारतातील पारंपरिक पदार्थाला ट्विस्ट देऊन ‘फायर डोसा’ बनविला जातो आहे. आता हा फायर डोसा म्हणजे काय? तर ज्यावर हा डोसा बनतो त्या तव्याच्या कडांना वर्तुळाकृती लागलेली आग. सिरोहीने आपल्या ‘फूडी_इन्कनेट’ नावाच्या फूड ब्लॉगिंग पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

अमर सिरोहीने शेअर केलेला हा व्हिडीओ नेमका काय आहे? पाहूया

असा बनतो फायर डोसा

सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस कॉर्न, विविध मसाले, भाज्या, चीज आणि सॉससह हा फायर डोसा तयार करताना दिसतो आहे. यावेळी लहानशा फॅनच्या मदतीने त्याने तव्याच्या बाजूला आगीचं रिंगण तयार केल्याचं पाहायला मिळालं आहे. इंदूर प्रवासादरम्यान अमर सिरोहीला या फायर डोसा विकणार्‍या रेस्टॉरंटचा शोध लागला. ही अनोखी पद्धत पाहून अमरने याचा व्हिडिओ थेट इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

काहीच वेळात इंटरनेटवर ट्रेंड

अमर सिरोहीने हे शेअर केलेला हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे कि काहीच वेळात इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागला. या व्हिडीओने नेटकऱ्यांना आश्चर्यचकीत तर केलंच पण सोबतच या अनोख्या पद्धतीने भारावून देखील टाकलं आहे. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार या फायर डोसाची किंमत १८० रुपये इतकी आहे.