Madhya Pradesh Bittu Tabahi River cleaner: “सुरुवातीला लोक मला वेडा म्हणाले. पण नदीची अवस्था इतकी बिकट झाली होती की प्रशासनाची वाट पाहत बसणे शक्य नव्हते,” हे उद्गार आहेत मध्य प्रदेशातील सुरेंद्र सिंह चौधरी या २० वर्षीय तरुणाचे. अजणार नदीला आलेले नाल्याचे स्वरूप आणि पात्रात साचलेला प्रचंड कचरा पाहून व्यथित झालेल्या या तरुणाने कोणत्याही मदतीची किंवा सरकारी मोहिमेची वाट न पाहता स्वतःच नदीची स्वच्छता करण्याचे ठरवले. त्याच्या या एकहाती लढ्यामुळे केवळ अजणार नदीचे रूप पालटत नसून स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सोशल मीडियावर ‘बिट्टू तबाही’ या नावाने परिचित असलेला सुरेंद्र नदीपात्रात उतरून प्लास्टिक, सडलेला कचरा आणि मानवनिर्मित घाण स्वतः बाहेर काढत आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम कोणत्याही संस्थेचा वा अधिकृत उपक्रमाचा भाग नाही. कचरा काढण्यासाठी लागणारे साधे साहित्य, ग्लोव्हज आणि पिशव्यांचा खर्च तो स्वतःच्या खिशातून करत असून दररोज न चुकता नदीकाठी हजेरी लावत आहे.

‘बिफोर – आफ्टर’ची छायाचित्रे व्हायरल

सुरेंद्रने इन्स्टाग्रामवर नदी स्वच्छतेपूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. पहिल्या छायाचित्रात प्लास्टिक आणि कचऱ्याने व्यापलेली नदी दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात वाहते, स्वच्छ पाणी नजरेस पडते. एका व्यक्तीचा दुर्दम्य निश्चय पर्यावरणात किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्याच्या या कार्याची दखल घेत त्याचे कौतुक केले होते. सध्या इन्स्टाग्रामवर त्याचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला

सुरेंद्रच्या कामाचे सोशल मीडियावर कौतुक होत असले तरी त्याच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. एप्रिलमध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता की, अस्वच्छ पाणी आणि कचऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या हाताची त्वचा संक्रमित झाली आहे. “नदी स्वच्छ करण्यासाठी मला एक यंत्र बनवायचे होते. पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी विद्यार्थी आहे. त्यामुळे मी हातांनीच शक्य होईल तितकी स्वच्छता करत आहे. त्यामुळे मला जंतुसंसर्ग झाला. माझ्या हाता-पायाची त्वचा निघाली आहे”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

कौतुकाबरोबरच प्रशासनावर तीव्र संताप

सुरेंद्रच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी यातून एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुढे आला आहे. एका सार्वजनिक नदीच्या स्वच्छतेसाठी विशीतील तरुणाला एकट्यालाच का उतरावे लागावे?

एका तरुणाला नदीपात्रात उतरून कचरा साफ करताना पाहून नागरिकांनी नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे. “पालिकेसाठी ही अत्यंत शरमेची बाब आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका युझरने सुरेंद्रच्या रिलखाली नोंदवली. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, “ज्या कामासाठी स्थानिक प्रशासनाकडे करदात्यांचा पैसा, मनुष्यबळ आणि जबाबदारी आहे, ते काम एका तरुणाला पदरमोड करून करावे लागत आहे. रस्ते, नद्या, कचरा व्यवस्थापन यात अपयशी ठरणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी कधी निश्चित होणार?”