इराणमध्ये सुरू असलेले युद्ध आणि तणावामुळे प्रमुख मध्य-पूर्व बाजारपेठांमध्ये निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम म्हणून संपूर्ण भारतात टरबुजाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रमझान महिन्यात आखाती देशांमध्ये फळांची मागणी वाढलेली असते, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये देशातील फळ बाजारात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि ओमान यासारखे देश, विशेषतः रमझानच्या काळात भारतातील टरबुजांचे प्रमुख आयातदार आहेत.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या एका वृत्तानुसार या देशांमध्ये होणारी निर्यात सध्या थांबली असून, निर्यातीसाठी तयार असलेला शेतमाल आता मोठ्या प्रमाणात देशांतर्गत बाजारपेठेत वळवला जात आहे. यामध्ये टरबूज आणि खरबूज यांसारख्या फळांचा समावेश आहे.
बाजारात अचानक पुरवठा वाढल्याने होलसेल बाजारात किमती कमी झाल्या आहेत. आशियातील सर्वात मोठ्या फळ आणि भाजी मंडईंपैकी एक असलेल्या एपीएमसी आझादपूर मंडईमध्ये टरबुजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या, टरबुजाचा दर प्रति क्विंटल सुमारे २३०१ रुपये आहे, जो फेब्रुवारीमध्ये ३२७५ रुपये होता. म्हणजेच फक्त एका महिन्यात दरात २९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
जरी किमतीत मोठी घसरण झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत दर अजूनही जास्त आहेत. मार्च २०२५ मध्ये याच मंडईत टरबुजाचा होलसेल भाव १४८२ रुपये प्रति क्विंटल होता.
विशेष बाब म्हणजे, होलसेल बाजाराचा परिणाम का क्विक सेल प्लॅटफॉर्मवरती फारसा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. दिल्लीमध्ये क्विक कॉमर्स अॅपवरती टरबूज हे १०० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. बेंगळुरूमध्ये, किमती सुमारे ८० रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत, ज्या सर्वसाधारण किरकोळ दरांशी जुळणाऱ्या आहेत.
मात्र सोशल मीडियावरील चर्चांवरून असे दिसून येते की काही स्थानिक बाजारपेठांमध्ये परिस्थिती वेगळी असू शकते. अनेक वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की, अति पुरवठ्यामुळे काही भागांत किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.”
कर्नाटक येथील एक कृषी उद्योजक अरुणा उर्स यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, काही भागांमध्ये टरबुजाचे दर प्रति किलो ७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. याचे कारण म्हणजे रमझानच्या काळात मध्यपूर्वेत पाठवण्यासाठी लावण्यात आलेले टरबूजाचे पीक आता मोठ्या प्रमाणात देशांतर्गत बाजारपेठेत दाखल होत आहे, असे ते म्हणाले.
या परिस्थितीमुळे सोशल मीडियावर जागतिक तणावाचे आणि व्यापार मार्गात अडथळा आल्याचे व्यापक आर्थिक परिणाम याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी नमूद केले के, पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा परिणाम शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही किमतीतील बदलांच्या स्वरूपात लगेच दिसून येतो.
“जागतिक पुरवठा साखळी दोन्ही मार्गांनी चालते, कारण जेव्हा निर्यात बंद पडते, तेव्हा स्थानिक बाजारपेठांना त्याचा परिणाम लगेच जाणवतो,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.
चर्चेदरम्यान कमेंट सेक्शनमध्ये, स्वतःची ओळख शेतकरी म्हणून सांगणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, निर्यातीत अचानक निर्माण झालेल्या अडथळ्यांचा शेतमालाच्या दरांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्या वापरकर्त्याने लिहिले की, आधी चांगल्या दर्जाचे टरबूज सुमारे २५ रुपये प्रति किलो दराने विकले जात होते, पण आता मालाचा दर्जा उत्तम असूनही दर ६-७ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. या कमेंटनुसार, निर्यातीवर असलेली बंधने आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे व्यापारी खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र याबाबतची सत्यात पडताळण्यात आलेली नाही.
