सोशल मीडियावर दररोज नवीनवीन घटना व्हायरल होत असतात. यातील काही घटना अशा असतात ज्या वाचल्यावर किंवा पाहिल्यानंतर आपलं मनोरंजन होतं. मात्र काही घटना अशा असतात ज्या ऐकताच आपणाला धक्का बसतो. सध्या उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे येथील एका तुरुंगातून एक कैदी पळून गेला होता, ज्याला पोलिसांनी खूप प्रयत्न करुन पकडले, शिवाय त्याने आपण पळून का गेलो याची एक रंजक कहाणी सांगितली आहे. जी ऐकल्यानंतर पोलीसदेखील थक्क झाले आहेत.
तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण…
अमरोहा जिल्ह्यातील एका कैद्याने पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबण्याचा इशारा दिला तरीही तो पळतच राहिला. यानंतर पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडली आणि अखेर त्याला पकडलं. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. जी ऐकल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकित झाले.
हेही पाहा- भरधाव कारमधून डोकं बाहेर काढणं पडलं महागात, क्षणात झाला भयानक अपघात, VIDEO व्हायरल
बायको मित्राबरोबर पळून गेली –
पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केलेल्या कैद्याचं नाव वाजिद अली असं आहे. वाजिदने सांगितलं की तो त्याच्या पत्नीला शोधण्यासाठी निघाला होता, जी त्याच्याबरोबर तुरुंगात असणाऱ्या दुसऱ्या एका सहकारी कैद्याबरोबर पळून गेली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, तो मुरादाबाद तुरुंगात असताना त्याची भेट रिझवान नावाच्या एका कैद्याशी झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, या काळात वाजिदची पत्नी त्याला भेटण्यासाठी नियमितपणे तुरुंगात येत असे. वाजिदने आपल्या पत्नीची त्याचा नवीन मित्र रिजवानशी ओळख करून दिली, परंतु कधीतरी हा मित्रच आपला शत्रू होईल याची कल्पना देखील वाजिदला नव्हती. हो कारण वाजिदची पत्नी आणि रिजवान यांचं एकमेकांशी जास्त बोलणं सुरू झालं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
दरम्यान, काही दिवसांनी रिजवानची तुरुंगातून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर रिजवान आणि वाजिदची पत्नी एकमेकांना भेटले आणि ते दोघेही पळून गेले. बरेच दिवस बायको तुरुंगात भेटायला आली नाही, तसेच तिच्याबाबतची काहीच माहिती मिळत नसल्याने वाजिदने चौकशी केली असता. ती रिझवानबरोबर पळून गेल्याची त्याला समजले. यानंतर वाजिदने रिझवानचा बदला घेण्याचे ठरवले आणि पोलिस व्हॅनमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोलिसांनी पकडलं.