Dog Cat Fight Funny Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे भयानक, तर काही फार हसवणारे असतात. त्यात विशेषत: प्राण्यांच्या शिकारीचे धोकादायक व्हिडीओ असतात, जे पाहूनच काळजात धडकी भरते; पण सध्या सोशल मीडियावर शिकारीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. त्यात एक मांजर दबक्या पावलांनी येत गच्चीवर धान्य खाणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्न करत असते. ती चिमण्यांवर झडप घालणार इतक्यात मागून कुत्र्याचं पिल्लू येतं आणि ते असं काही करतं की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या गच्चीवर धान्य सुकत घातलंय. ते धान्य खाण्यासाठी अनेक चिमण्यांनी गर्दी केलीय, चिमण्या हळूहळू धान्य खातायत. याच वेळी एक मांजर दबक्या पावलांनी हळूहळू सरकत चिमण्यांच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करते. मांजर डोळे मिचकावत, हळुवारपणे शेपूट हलवत एकेक पाऊल टाकतेय. यावेळी ती चिमण्यांवर झडप घालण्याच्या तयारीतच असते. तेवढ्यात मागून एक कुत्र्याचं पिल्लू येतं आणि ते तिच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरतं.
कुत्र्याच्या पिल्लामुळे प्लॅन फिसकटला
कुत्र्याचं पिल्लू अगदी आनंदात उड्या मारत, शेपटी हलवत त्या मांजरीजवळ येतं. मांजर नेमकं काय करतेय याबाबत त्याला काहीच माहीत नसतं. त्यामुळे तो आपल्याच धुंदीत तिच्याजवळ येतो; पण पिल्लाच्या अशा अचानक आवाज करीत येण्यानं चिमण्या घाबरतात आणि त्या सगळ्या भुर्रकन उडून जातात. कुत्र्याच्या पिल्लाच्या त्या कृतीमुळे तिचं हातातोंडाशी आलेलं भक्ष्य हिरावलं जातं. ते लक्षात आल्यावर मांजर रागानं लालबुंद होऊन कुत्र्याच्या पिल्लाकडे बघू लागते. त्यानंतर ती पंजानं सरळ त्याला मारण्यास सुरुवात करते.
हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो @Moonlighhy नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकही त्यावर भन्नाट कमेंट करीत आहेत. एका युजरनं व्हिडीओवर कमेंट करीत लिहिलं, “हे पिल्लू नाहीये, हे स्पॉयलर आहे.” दुसऱ्यानं लिहिलं, “मांजर या मित्राला पुन्हा कधीही शिकार करायला घेऊन जाणार नाही.” तिसऱ्यानं लिहिलं, “पिल्लू म्हणत होतं की, भाऊ, मलाही खेळायचं आहे! ज्यावर मांजरीनं त्याला नकार दिला. मग त्या पिल्लानं संपूर्ण खेळ खराब केला आहे.
