Cobra VS Peacock Viral Video : मोर जेव्हा आपली रंगीबेरंगी पिसे फूलवून नाचू लागतो तेव्हा तो जगातील सर्वात सुंदर आणि शांत पक्षी वाटतो. पण तुम्हाला माहितेय का की, या मनमोहक पक्षाचा साप हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आपण आजवर साप आणि मुंगूस यांच्यातील वैमनस्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. पण साप आणि मोर यांच्यातील वैमनस्य ही निसर्गातील सर्वात प्राचीन कथांपैकी एक आहे. सध्या सोशल मीडियावर मोर आणि भल्यामोठ्या किंग कोब्राचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

साप आणि मोर यांना आमनेसामने पाहणे हे एक दुर्मिळ दृश्य आहे. व्हिडीओमध्ये दोन मोर आणि एक लांडोर दिसत आहे, त्यांच्यासमोर एक फणा पसरुन बसलेला एक भलामोठा किंग कोब्रा आहे, दोन्ही मोर आणि लांडोर किंग कोब्राकडे टक लावून पाहतायत. पण कोणीही कोणावर हल्ला करत नाही, ते सर्वचं एकमेकांपासून अंतर राखून आहे. सर्व अगदी सावधगिरीने ते उभे आहेत पण कुणी मागेही हटत नाही. क्षणात वाटतं की, हे एकमेकांवर हल्ला करतील पण तसे काही घडत नाही, सर्व शांतपणे आपापल्या जागी उभे आहेत.

साप आणि मोराचा हा व्हिडीओ @dadi.shanti.official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युझरने लिहिले की, “साप आणि मोर यांचे खूप जुने वैर आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मोर साप खातात. मला वाटते हा जरा मोठा आहे, नाहीतर त्यांनी आतापर्यंत गिळून टाकला असता.”

जीवशास्त्रानुसार, मोर आणि साप यांच्यात कोणतेही ‘वैयक्तिक वैर’ नाही; उलट, हे पूर्णपणे शिकारी-भक्ष्य संबंध आहेत. मोर शांत स्वभावाचे वाटत असले तरी, ते सर्वभक्षी पक्षी आहेत. त्यांची पायांची नखे अत्यंत तीक्ष्ण आणि चोच खूप मजबूत असते. मोर लहान कीटक आणि साप दोन्ही मोठ्या आवडीने खातात. साप किंवा विषारी किंग कोब्र्याचा सामना करावा लागल्यास ते फार चपळपणे लढतात.

मोराची जाड, मोठी पिसे त्यांना सर्पदंशापासून वाचवतात. जेव्हा साप हल्ला करतो, तेव्हा तो अनेकदा मोराच्या पिसांमध्ये अडकतो, ज्यामुळे विष त्याच्या शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. मोर आपल्या मजबूत चोचीने सापाच्या डोक्यावर वारंवार प्रहार करून आणि त्याला ठार मारतो.

पावसाळ्यात मोर मोठ्या आनंदाने नाचतात. विज्ञानानुसार, पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे साप आणि इतर कीटक बिळांमधून बाहेर येतात. मोरांना माहित असते की, आता त्यांना त्यांचे आवडते भक्ष्य सहज मिळेल, त्यामुळे हा त्यांच्यासाठी मेजवानीचा काळ असतो.

आजही भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये, लोक आपल्या घरांजवळ मोर पाळायला पसंत करतात, जेणेकरून साप त्यांच्या घरांजवळ येऊ नयेत. मोराचा आवाज ऐकूनच साप त्या भागातून दूर निघून जातात. एकूणच, हे वैर निसर्गाने निर्माण केलेले एक चक्र आहे, जे पर्यावरणातील सापांची संख्या नियंत्रित करण्याचे काम करते.