Elephant Eating Garbage Video : जंगल हे वन्यजीवांच्या हक्काचा निवारा आहे; पण मानवाच्या बेजबाबदारपणामुळे हळूहळू त्यांचेही घर अस्वच्छ होत चालले आहे. लोक स्वतःचे घर चकाचक ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात; पण अनेकदा घरातून निघणारा कचरा अशा ठिकाणी फेकून देतात, ज्याचा वाईट परिणाम मुक्या प्राण्यांवर होतो. सोशल मीडियावर जंगलाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो हीच चिंताजनक परिस्थिती समोर आणतो. त्यात एक हत्ती जंगलाच्या कडेला लोकांनी टाकलेल्या कचऱ्यात अन्न शोधत ते खाताना दिसत आहे. या दृश्याने लोकांचे मन हेलावून टाकले आहे.

व्हिडीओमध्ये एक हत्ती जंगलाजवळ उभा असल्याचे दिसते. सामान्यतः हत्ती जंगलात मुक्तपणे फिरताना, झाडांची पाने खाताना आणि आपल्या कळपासह वेळ घालवताना दिसतात; पण या व्हायरल व्हिडीओची कथा मात्र वेगळी आहे. हत्ती जंगलाच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्वतःसाठी अन्न शोधत आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असून, तो कोणीतरी तिथेच फेकून दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

जंगलाच्या कडेला कचऱ्यात अन्न शोधताना दिसला हत्ती

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनेही या दृश्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्याने लिहिले की, हत्तीला पाहून आधी आनंद झाला; पण त्याला कचऱ्यात अन्न शोधताना पाहून मन सुन्न झाले. त्यांनी हत्तीला मदत करण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यासह त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मांडली की, जंगल हे प्राण्यांचे घर आहे; कोणतीही कचराकुंडी नाही.

इन्स्टाग्रामवरील aesthetic_voyager_ या अकाऊंटवरून हत्तीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, या व्हिडीओमध्ये दिसलेल्या या अनुभवाबद्दल हॅरी मल्होत्रा यांनीही माहिती दिली. त्यांच्या मते, एके दिवशी घरी परतत असताना त्यांना वाटेत हत्ती दिसला. त्याला पाहून ते खूश झाले; पण जेव्हा त्यांची नजर हत्तीवर पडली, तेव्हा तो कचऱ्याच्या ढिगात खाण्याच्या वस्तू शोधत होता. ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले.

हत्तीची ही दयनीय अवस्था पाहून हॅरी यांनी विचार केला की, त्याला काहीतरी खाण्यासाठी दिले पाहिजे. ते त्याच्यासाठी केळी आणायला गेले; पण त्यांना केळी मिळाली नाहीत. त्यानंतर ते हत्तीसाठी ब्रेड घेऊन परतले. मात्र, त्यांनी हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताच तो घाबरला आणि पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला.

अशा प्रकारे हॅरी यांचा मदतीचा प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही; परंतु त्यांचा हा अनुभव मानवासमोर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा करतो. जंगलाच्या आजूबाजूला असा कचरा फेकून आपण त्या प्राण्यांसाठी किती अडचणी निर्माण करीत आहोत, ज्यांचा या अस्वच्छतेशी काहीही संबंध नाही?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने म्हटले की, लोकांना फक्त स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचं असतं, मग बाहेर कितीही घाण पसरली तरी चालेल. तर दुसऱ्या एका युजरने असेही म्हटले की, वन्यप्राण्यांना स्वतःच्या मनानं खायला घालणं नेहमीच योग्य असते, असे नाही. आणखी एका युजरने हा व्हिडीओ पाहून आपले दुःख व्यक्त केले.