Wildlife Viral Video : निसर्गात असे अनेकदा पाहायला मिळते की, मोठे पक्षी लहान प्राण्यांची शिकार करतात. विशेषत: बगळ्यासारखे पक्षी पाण्यात किंवा जमिनीवरील मासे आणि साप सहजपणे पकडतात. कधी कधी हे शिकारीचे व्हिडीओ फार भयानक आणि धडकी भरवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक बगळा सापाची शिकार करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये एक बगळा जमिनीवर चालताना दिसतोय. यावेळी त्याची नजर एका लहान सापावर पडते. कदाचित त्याला वाटले असेल की, साप एक सोपी शिकार आहे आणि तो काही सेकंदात त्याला पकडेल. यावेळी बगळा हळूहळू पुढे सरकतो आणि अचानक सापावर हल्ला करतो, पण पुढच्याच क्षणी गेम पलटतो.

बगळा सापाला त्याच्या चोचीने पकडण्याचा प्रयत्न करत असतो. पण, साप विजेच्या वेगाने हलू लागतो. यामुळे साप बगळ्याच्या चोचीतून निसटून खाली पडतो. असे दोन ते तीन वेळा होते, पण बगळा काही शिकार करण्याचे सोडत नाही. एकवेळ तर बगळा त्याला चोचीत पकडून उडून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. पण, साप वेळोवेळी त्याला प्रत्युत्तर देतो. अखेर तो योग्य संधीची वाट बघून बरोबर बगळ्याच्या मानेला वेटोळा घालतो. हे इतक्या वेगाने घडते की बगळ्याला प्रतिकार करण्याची संधीच मिळत नाही. कारण सापाची पकड इतकी मजबूत होती की, बगळ्याला स्वतःला सोडवणे कठीण होते. क्षणभर असे वाटले की शिकारीच त्याचा शिकार झाला आहे.

बगळा आपले पंख फडफड करत सुटण्याचा फार प्रयत्न करतो, पण साप आपली पकड काही सोडत नाही; तो अशाप्रकारे बगळ्याला पकडतो की बगळा उडूदेखील शकत नाही.

हे दृश्य पाहताना समजते की, जंगलातील प्रत्येक क्षण अनिश्चित असतो. कोणीही पूर्णपणे सुरक्षित नाही. कधीकधी एखादा लहानसा प्राणीदेखील मोठा धोका निर्माण करू शकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे; तर अनेकांनी त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. निसर्गाचे नियम कधीकधी खूप आश्चर्यकारक असतात, जिथे संपूर्ण खेळ एका क्षणात बदलू शकतो.