कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP या चळवळीला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन केलं. ३७ दिवस चाललेलं हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याने प्रचंड चर्चेत राहिलं. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन संपलं असलं तरीही अभिजीत दिपके चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांची पुढची दिशा काय असणार? याबाबत विविध चर्चा होत आहेत. अभिजीत दिपके यांच्याबाबत एका भविष्य सांगणाऱ्या अंकशास्त्राचे अभ्यासक संदीप बजाज यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय म्हटलं आहे संदीप बजाज यांनी?

अभिजीत दिपके यांचं भविष्य एकदम वाईट आहे. कारण अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा ड्रायव्हर किंवा कंडक्टर २, ४ किंवा ८ आहे असे लोक बुडबुड्याप्रमाणे वर येतात आणि मग तसेच निघून जातात.पुढचं वर्ष अभिजीत दिपकेंच्या चिंता वाढवणारं, काळजी वाढवणारं असू शकतं. कदाचित पुढच्या वर्षी अभिजीत दिपकेंना तुरुंगातही जावं लागू शकतं. कारण त्यांचा पर्सनल इयर ४ येईल, दोनचाही शत्रू ४ आहे आणि ८ चा ही शत्रू ४ आहे. त्यामुळे पुढचं वर्ष हे अभिजीत दिपकेंना अत्यंत सावधगिरीने पावलं टाकत काढावं लागणार आहे. या वर्षी त्यांना वाटतं आहे मला जॅकपॉट लागला आहे. पण ६ फेब्रुवारीनंतर अभिजीत दिपकेंच्या अडचणी खूप वाढणार आहेत. त्यामुळे अंकशास्त्रानुसार त्यांनी त्यांच्या नावात बदल केला पाहिजे अर्थात त्यांचा विश्वास असेल तरच. त्यांनी जर नावात बदल केलं तर कदाचित त्यांचा फायदा होऊ शकतो. असं संदीप बजाज यांनी म्हटलं आहे. !@sanddeepbajajnumero या अकाऊंटवर हा व्हिडीओ संदीप बजाज यांनी पोस्ट केला आहे.

संदीप बजाज यांच्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया

संदीप बजाज यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलंय असले अंदाज कायमच खोटे ठरतात, याला काही अर्थ नाही. दुसरा एक युजर म्हणतो तुम्ही भाकित वर्तवलं ठीक आहे सर, अभिजीत त्याचं काम करेल. आणखी एका युजरने म्हटलंय या व्हिडीओसाठी अमित शाह यांनी तुम्हाला किती पैसे दिलेत? चौथा युजर म्हणतो कुठलाही अंदाज किंवा भाकित कधीही खरं होत नाही. तर काही युजर्स म्हणत आहेत की अंकल, तुम्ही हा व्हिडीओ मोदींना घाबरुन केला आहे का? मोदी कधी जातील पंतप्रधान पदावरुन ते पण सांगा असंही काही युजर्स म्हणत आहेत.

अभिजीत दिपके यांनी त्यांची पुढची दिशा लवकरच जाहीर करणार असं म्हटलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनानंतर ते छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आले आहेत. मागील आठवड्याभरापासून त्यांच्या मुलाखती सुरु आहेत. दरम्यान संदीप बजाज यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

(टीप: वरील बातमी संदीप बजाज यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन केली गेली आहे.)