नासाच्या अभ्यासानुसार अशी माहिती समोर आली आहे की चंद्राच्या कक्षेत अगदी थोडीशी हालचाली झाल्यानेही २०३० मध्ये समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो. नासाच्या अभ्यासानुसार,९ वर्षानंतर संपूर्ण जगावर पूराचा परिणाम दिसून येईल. याचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेत दिसून येईल, असे अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे. जगभरात हवामानात बदल होत असताना चक्रीवादळ आणि पूरांची संख्या बर्‍याच ठिकाणी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतही अनेक चक्रीवादळ आलेली दिसली. आता या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की चंद्राच्या कक्षेत थोडीशी हालचाल झाल्यास जगात एक भीषण पूर येईल आणि याचा अमेरिकेच्या किनारपट्टीचा सर्वाधिक फटका बसेल.

जर आपल्याला चंद्राच्या कक्षेतल्या हालचालीमुळे होणारा विध्वंस टाळायची असेल तर जगाला आतापासून बचावासाठी योजना तयार कराव्या लागतील. नासाच्या अभ्यासानुसार चंद्रामुळे समुद्राच्या लाटा नेहमीच प्रभावित होतात. चंद्राच्या हालचालीनंतर जगातील बर्‍याच भागात पूर येईल. यामुळे जगातील बर्‍याच देशांमध्ये मोठी उपद्रव होण्याची शक्यता आहे. यापेक्षा अमेरिकेत ही समस्या अधिक असेल. कारण त्या देशात किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांची संख्या जास्त आहे.

अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सहाय्यक प्राध्यापक फिल थॉम्पसन यांनी सांगितले की चंद्राच्या कक्षीय हालचालीला पूर्ण होण्यासाठी १८.६ वर्षे लागतात. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या हालचालींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

थॉम्पसन यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, चंद्रावर नेहमीच  हालचाल पाहायला मिळते, पण ग्रहाच्या तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत असल्याने हे धोकादायक ठरत आहे. हे चक्र २०३० मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समुद्राच्या वाढत्या पातळीसह विनाशकारी पूर येऊ शकेल. नासाच्या वेबसाइटनुसार, चंद्र जसजसा लंबवर्तुळाकार कक्षा बनवतो तसा त्याचा वेग बदलतो. त्यामुळे त्याच्या कक्षेत हालचाल होते.

थॉम्पसन म्हणाले की जर महिन्यात १०-१५ वेळा असे पूर आले तर जनजीवनावर वाईट परिणाम होईल. लोकांचा व्यवसाय बंद होईल. पाणी भरल्यास डासांचे आणि इतर आजार उद्भवू शकतात. ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील बर्फ आणि हिमनदी सतत वितळत आहेत, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. अशा परिस्थितीत नासाच्या या भविष्यवाणीने जगाला सतर्क करायला हवं आणि यापासून वाचण्यासाठी काही योजना तयार करायला हव्या.