Delhi Metro Women Coach Viral Video : दिल्ली मेट्रोसंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लाखो लोक या मेट्रोने प्रवास करतात; पण प्रवासादरम्यान अनेकदा वादाच्या घटना घडतात, ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही तीव्र संताप व्यक्त कराल. व्हिडीओत मेट्रोतील महिलांच्या डब्यात चार अल्पवयीन मुली असं काही कृत्य करतायत, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. श्रुती शर्मा नावाच्या एका महिला प्रवाशाने सांगितले की, ती हौझ खास या मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढली. यावेळी डब्यात आधीच असलेल्या चार अल्पवयीन मुली जमिनीवर बसून गोंधळ घालत होत्या आणि शिवीगाळ करत होत्या.
सुरुवातीला लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले; पण त्यांचे तऱ्हेवाईक वागणे हळूहळू आणखीनच वाढत गेले. त्या मुली डब्यातील इतर महिलांबद्दल टिप्पणी करू लागल्या आणि त्यांना अपमानास्पद नावाने हाक मारू लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलींनी एका महिलेचे कपडे आणि तिचे दिसणे यांवरून टिप्पणी सुरू केली. तिला चिडवायला सुरुवात केली. जेव्हा इतर प्रवाशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या उलट त्यांनाच शिवीगाळ करू लागल्या. त्यामुळे डब्यात अत्यंत अस्वस्थताजनक वातावरण निर्माण झाले. अनेक जणी आपल्या जागेवरून उठून निघून गेल्या.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुलींचा एक ग्रुप अतिशय घाणेरड्या पद्धतीने हातवारे करून प्रवाशांना अश्लील शिवीगाळ करतोय. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची वागणूक इतकी घाणेरडी असूनही त्या चक्क एकमेकींना टाळी देत मोठमोठ्याने हसताना दिसतायत.
श्रुती शर्मा म्हणाली की, या घटनेने ती आतून हादरली. इतक्या लहान वयात अशी भाषा आणि वर्तन अत्यंत चिंताजनक आहे. अशा मुलींना मेट्रोमध्ये चढण्याची परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्नही तिने उपस्थित केला.
सोशल मीडियावर लोकांचा संताप
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक वापरकर्त्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली. “त्या लहान आहेत”, असे म्हणून अशा दुर्वर्तनाकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे, असे लोकांनी म्हटले आहे.
