Woman Attaches Blinkit Invoice Instead Of CV In Job Application : नोकरीच्या शोधात असताना सर्व जण एक चांगला रेझ्युमे तयार करून ठेवतात. या रेझ्युमेच्या आधारे कंपनी आपल्याला नोकरी द्यायची की नाही हे ठरवते. कारण- त्यातून उमेदवारीची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि कौशल्य यांची माहिती मिळते, त्यामुळे नोकरीसाठी रेझ्युमे ही महत्त्वाची गोष्ट असते. आता विचार करा, एखाद्या कंपनीत तुम्ही जॉबसाठी अप्लाय करतोय; पण त्यावेळी रेझ्युमेऐवजी चुकून तुमच्याकडून भलतीच फाईल पाठवली गेली तर… हे वाचताना थोडं विचित्र वाटेल; पण एका तरुणीच्या बाबतीत असं घडलं आहे. तिनं एका कंपनीत जॉबसाठी अप्लाय करताना चुकून रेझ्युमेऐवजी ब्लिंकइटचे बिल इमेल केले, ज्यामुळे पुढे जे काही घडले ते आपण जाणून घेऊ…
रिझ्युमेऐवजी पाठवले ब्लिंकइटचे बिल
ही हास्यास्पद घटना हिमांशी नावाच्या एका मुलीबरोबर घडली आहे,जी अलीकडेच एका नोकरीसाठी अर्ज करत होती. पण त्यावेळी घाईगडबडीत तिने आपला रेझ्युमे जोडण्याऐवजी ब्लिंकइटचे बिल ईमेल केले. जेव्हा रिक्रूटरने तो ईमेल ओपन केला. तेव्हा त्याला कौशल्ये आणि अनुभवाऐवजी दूध, दही आणि स्नॅक्सची लिस्ट मिळाली. त्यानंतर रिक्रूटरने नम्रपणे उत्तर दिले, “अर्ज केल्याबद्दल धन्यवाद! पण हिमांशी तुम्ही चुकून तुमचे ब्लिंकइटचे बिल जोडले आहे.”
हिमांशीने X वर त्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात तिने, “मीच माझी सर्वांत मोठी शत्रू आहे,” अशी कॅप्शन देऊन स्वतःचीच खिल्ली उडवली. हे ट्विट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. त्यानंतर, हिमांशीनं दुसऱ्या एका ट्विटमध्ये ब्लिंकइटला टॅग करत लिहिले, “आता नोकरी तर मिळणार नाही; पण किमान फ्री आइस्क्रीम तरी द्या.”
दरम्यान, तरुणीच्या या कृतीवर आता युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “मी चुकून सॅलरी स्लिप पेस्ट केली.” दुसऱ्याने म्हटले, “तुमच्या रेझ्युमेवरून दिसते की, तुम्ही यात पारंगत आहात.” आणखी एकाने कमेंट केली, “बिलानुसार पैसे देऊ नका याची काळजी घ्या.” दुसऱ्याने उपहासाने म्हटले, “बरं, एचआरने तुम्हाला नोकरी नाकारण्यासाठी एक निमित्त शोधून काढलं आहे.”
