Vande Bharat Viral Video : जलद आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक जण वंदे भारत ट्रेनचा पर्याय निवडतात. या ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अत्याधुनिक सुविधांचा. त्याशिवाय प्रवाशांना जेवणाचीही सोय आहे. त्यामुळे वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण, अनेकदा या ट्रेनमधील जेवणाच्या दर्जाबाबत प्रवासी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका महिला प्रवाशानं वंदे भारतमधील जेवणामुळे तिला एका गंभीर समस्येचा सामना करावा लागला, असा दावा केलाय. तिच्यासह तिच्या मुलालाही यामुळे त्रास झाल्याचं तिनं सांगितलं आहे. महिलेनं याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
रांचीची रहिवासी असलेल्या आयुषी सिंगनं दावा केला आहे की, वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवण जेवल्यानंतर ती अचानक आजारी पडली. सोशल मीडियावर आपला अनुभव सांगताना तिनं स्पष्ट केलं की, तिला गंभीर अॅलर्जीचा त्रास झाला, तर तिच्या दोन वर्षांच्या मुलाला जुलाब झाले. आयुषीच्या म्हणण्यानुसार, ती २७ मार्च रोजी ट्रेन क्रमांक २२५०० (बीएसबी-डीजीएचआर वंदे भारत एक्सप्रेस) च्या ई१ डब्यातून प्रवास करत होती.
आयुषी सिंगनं आपल्या पोस्टमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं आहे, इतकंच नव्हे, तर याला जीवघेणी ॲलर्जी, असंही म्हटलं आहे. वंदे भारतमधील जेवणामुळे झालेल्या अॅलर्जीमुळे तिला रांचीमधील एका रुग्णालयातील भरती व्हावं लागलं, असंही तिनं सांगितलं आणि यासह तिनं वैद्यकीय अहवालाचा फोटोही शेअर केला आहे. तिनं लिहिलं आहे की, ट्रेनमध्ये दिलं जाणारं जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं आणि कर्मचाऱ्यांनी तिच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली नाही. तिनं पाण्याच्या चवीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान या पोस्टमध्ये तुम्हाला आयुषी सिंगचा चेहरा अतिशय वाईट प्रकारे सुजल्याचे दिसेल.
IRCTC ने दिले ‘असे’ उत्तर
या प्रकरणावर आयआरसीटीसीनं (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सांगितलं की, त्या ट्रेनमध्ये २७ मार्च रोजी देण्यात आलेल्या जेवणाची तपासणी करण्यात आली होती आणि ते समाधानकारक आढळलं. त्या दिवशी इतर कोणत्याही प्रवाशाकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती.
या घटनेमुळे रेल्वेतील जेवणाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आयआरसीटीसी आपल्या भूमिकेवर ठाम असली तरी प्रवाशांचा अनुभव मात्र वेगळंच काही सांगतोय.
