Woman Dhurandhar Style Dance Video : छंद माणसाला आनंद देतो, पण त्याने सर्वांचेच पोट भरू शकत नाही; त्यामुळे लोकांना छंद बाजूला ठेवत पोटापाण्यासाठी कमावावे लागते. पण, काम करतानाही ते छंद जोपासताना दिसतात. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं तर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकजण नोकरी धंदा करून आपली डान्सची आवड जपणारे दिसतात. सध्या अशाच एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जी कठीण काम करूनही आपला डान्सची आवड आनंदाने जोपासताना दिसतेय. नुकताच तिचा एक जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात ती सुपरहिट चित्रपट ‘धुरंधर’मधील एका गाण्यावर कमाल डान्स करतेय.

‘धुरंधर’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. मात्र, पहिल्या भागातील ‘शरारत’ हे गाणे अजूनही मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतंय. याच गाण्यावर त्या महिलेने जबरदस्त डान्स केलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यावर विटांचा मोठा खच आहे, पण इतकं वजन असूनही तिने सर्व स्टेप्स अचूकपणे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. सावित्री यादव असे या महिलेचे नाव असल्याचे समोर येतेय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सावित्री वीटभट्टीजवळ उभी असल्याचे दिसतेय. यावेळी तिथे प्रत्येकजण कामात गुंतलेत, पण ती डोक्यावर विटांचा खच ठेवून दमदार डान्स करतेय. हे काम इतके मेहनतीचे आहे, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर कुठेही त्रास दिसत नाही, उलट ती ‘कच्ची कली’ गाण्यावर आनंदाने नाचताना दिसतेय, विशेष म्हणजे ती नाचताना एकही वीट खाली पडत नाही आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशनही चुकवत नाही.

महिलेचा धुरंधर स्टाईल डान्स व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना या गाण्यातील मूळ डान्सर आयेशा खानची आठवण झाली. एका युझरने लिहिले की, “आयेशा खानला टॅग करा.” दुसऱ्या एका युझरने लिहिले की, “शिकणारा कुठल्याही परिस्थितीत शिकू शकतो आणि रील बनवणारा कुठेही रील बनवू शकतो.”