Road Accident Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन करतात, काही आश्चर्यचकित करतात, तर काही असे असतात की ते पाहिल्यानंतर काही क्षण आपण स्तब्धच होतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका तरुणीसोबत घडलेली घटना पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य दिसतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. वातावरण शांत असतं. एक तरुणी निवांतपणे रस्त्याने चालत असते. तिच्या हातात मोबाईल फोन असतो आणि ती त्यामध्ये इतकी गुंतलेली असते की आजूबाजूला काय सुरू आहे याकडे तिचं अजिबात लक्ष नसतं.
मात्र, काही सेकंदांतच असं काही घडतं ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी पुढे पुढे चालत असताना अचानक ती नजरेआड होते. क्षणभर पाहणाऱ्यांनाही काही समजत नाही. रस्त्यावर चालणारी व्यक्ती अचानक कुठे गायब झाली, असा प्रश्न अनेकांना पडतो. व्हिडीओ पाहणारे लोकही सुरुवातीला गोंधळून जातात.
खरं तर तिच्यासमोर एक मोठा धोका दबा धरून बसलेला असतो, पण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतल्यामुळे तिचं लक्ष त्याकडे जात नाही. पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो आणि ती थेट जमिनीखाली कोसळते.
यानंतर घडलेला प्रकार आणखी धक्कादायक आहे. काही क्षणांसाठी परिसरात कोणीच नसल्याचं दिसतं, त्यामुळे तरुणीची सुटका कशी होणार हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, सुदैवाने दूरवरून एक व्यक्ती धावत येताना दिसते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तो तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावतो.
थोड्याच प्रयत्नांनंतर त्या व्यक्तीला तरुणीला बाहेर काढण्यात यश येतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. ही घटना नेमकी कुठे घडली याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी व्हिडीओने जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओसोबत दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये ती तरुणी पडली होती. विशेष म्हणजे ती आत पडताच मॅनहोलचं झाकण पुन्हा बंद झालं आणि काही काळ ती आत अडकून राहिली. सुदैवाने एका डिलिव्हरी कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि तिची सुटका केली.
हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या घटनेला निष्काळजीपणाचा परिणाम म्हटलं आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरताना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘सुदैवाने कोणीतरी तिला पडताना पाहिलं, नाहीतर मोठी अनर्थकारी घटना घडली असती.’
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, स्मार्टफोन कितीही महत्त्वाचा असला तरी रस्त्यावर चालताना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. एका क्षणाचे दुर्लक्षही कधी कधी मोठ्या संकटाचं कारण ठरू शकतं.
