Woman jumps off moving auto: आजकाल कुठेही जाण्यासाठी अनेक लोक ऑनलाइन कॅब किंवा ऑटो बुक करतात आणि त्याद्वारे प्रवास करतात. त्यामुळे ट्रेन किंवा बसच्या गर्दीचा त्रास न होता, अगदी आरामात प्रवास करता येतो. एका क्लिकवर अगदी ५ ते १० मिनिटांत आपल्याला ही ऑटो न्यायला येते आणि इच्छित स्थळी ड्रॉप करते. पण, अनेकदा या प्रवासादरम्यान अनेकांना वाईट अनुभव येतो आणि अनेकदा धक्कादायक घटनाही घडतात. सध्या असाच काहीसा प्रकार बेंगळुरूमधील एका महिलेबरोबर घडला आहे.

बेंगळुरूमधील एका संतापजनक घटनेत, ड्रायव्हरने दारूच्या नशेत एका महिलेला चुकीच्या ठिकाणी नेल्याने तिला चालत्या ऑटोतून उडी मारावी लागली. नम्मा यात्री अ‍ॅपवरून होरामावू ते थानिसांद्रा या प्रवासासाठी तिने राईड बुक केली होती; परंतु ड्रायव्हर तिला चुकीच्या मार्गाने हेब्बलजवळ घेऊन जात होता.

हेही वाचा… जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

बेंगळुरूमधील धक्कादायक घटना

x अ‍ॅपवर या महिलेच्या पतीने एक पोस्ट शेअर केली; ज्यामध्ये त्याने या धक्कादायक घटनेबद्दल सांगितले. व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये महिलेच्या पतीने लिहिले, “नम्मा यात्री ऑटो इश्यू! माझ्या पत्नीने होरामावू ते थानिसांद्रा, बंगळुरू या रूटसाठी ऑटो बुक केली होती; पण ड्रायव्हर दारूच्या नशेत होता आणि तो तिला हेब्बलजवळ म्हणजेच चुकीच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याला वारंवार थांबण्यास सांगूनही त्याने ऐकले नाही आणि त्यामुळे तिला चालत्या ऑटोतून उडी मारणे भाग पडले.”

व्हायरल झालेली ही पोस्ट @AzharKh35261609 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली असून, या पोस्टवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “पोलिसांनी दोषीवर तत्काळ कारवाई करावी.” दुसऱ्याने, “मलाही असाच वाईट अनुभव आला होता”, अशी कमेंट केली.

हेही वाचा… “लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बेंगळुरू शहर पोलिसांनीही त्वरित प्रतिसाद देत, युजरला संपर्क तपशील आणि ऑटोसंबंधीची माहिती शेअर करण्यास सांगितले. तसंच नम्मा यात्रीने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून प्रतिक्रिया देत या समस्येकडे लक्ष वेधून घेतले, “अझहर, या प्रकरणासाठी पोलिसांची मदत घेतल्याबद्दल धन्यवाद. खात्री बाळगा, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून तत्काळ ड्रायव्हरचे खाते निलंबित करण्याची कारवाई केली आहे. तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास कृपया आम्हाला DM करा.”

या घटनेमुळे ॲप-आधारित वाहतूक सेवांमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि चालकाची जबाबदारी याबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Story img Loader